कचर्‍यामुळे तीर्थक्षेत्र येलवाडीचा श्वास कोंडला | पुढारी

कचर्‍यामुळे तीर्थक्षेत्र येलवाडीचा श्वास कोंडला

देहूगाव : तीर्थक्षेत्र येलवाडी हद्दीत बायपास रस्त्याच्या इंद्रायणी पुलाजवळ आणि इंद्रायणीवरील जुन्या पुलाशेजारी असलेल्या नवीन इंद्रायणी पुलाच्याकडेला मोठ्या प्रमाणात नागरिक कचरा टाकत आहेत, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कचर्‍याचा खच

श्रीक्षेत्र येलवाडी येथे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विठ्ठलनगर ते सांगुर्डी फाटा बायपास असा रस्ता आहे. तर, सांगुर्डी फाटा ते तळेगाव-चाकण फाटा हा अतिशय वर्दळीचा रस्ता आहे. परंतु, येलवाडी हद्दीतील बायपास रस्त्याच्या इंद्रायणी पुलाजवळ आणि इंद्रायणीवरील जुन्या पुलाशेजारी असलेल्या नवीन इंद्रायणी पूल परिसरात रात्रीच्या वेळी नागरिक कचरा टाकत आहेत. अशीच परिस्थिती येलवाडी गावच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिसत आहे. या ठिकाणीदेखील रस्त्याच्याकडेला मोठ्या प्रमाणात कचर्‍याचा खच झाला आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

येलवाडी ग्रामपंचायत प्रशासन कचर्‍याची निर्माण झालेली समस्या कधी सोडविणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु, ग्रामपंचायत प्रशासन या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

ग्रामस्थांनी व्यक्त केली नाराजी

पसिरात दिवसेंदिवस कचर्‍याची समस्या कठीण होत चालल्यामुळे गावातील नागरिक सरपंच, सदस्य यांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करू लागले आहेत. आता येलवाडीतील नागरिक सांगुर्डी फाटा ते तळेगाव चाकण फाटा हा प्रमुख रस्तादेखील कधी एकदा या दुर्गंधीयुक्त श्वासातून ग्रामपंचायत प्रशासन मुक्त करणार याची प्रतीक्षा
करीत आहेत.

दुर्गंधीने नागरिक त्रस्त

दोन-तीन दिवसांपूर्वी झालेला पाऊस आणि नतंर पडणार्‍या रणरणत्या उन्हामुळे या भागात कमालीची दुर्गंधी पसरली आहे. त्याचा त्रास वाहनचालक आणि स्थानिक रहिवासी यांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाहनचालक, स्थानिक नागरिक यांना रस्त्यावरून जाताना मोकळा श्वास घेणे कठीण झाले आहे.

Back to top button