नाशिक : ग्रामीण भागातून टँकरचे 11 प्रस्ताव | पुढारी

नाशिक : ग्रामीण भागातून टँकरचे 11 प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झालेली असताना ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे. ग्रामीण जनतेची पाण्यासाठीची सारी भिस्त टँकरवर अवलंबून आहे. जिल्ह्यात सध्या सुमारे 15 टँकरने जनतेला पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच येवला, इगतपुरी व अन्य काही तालुक्यांतून टँकरसाठीचे 11 प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येत्या काळात टँकरच्या संख्येत अधिक भर पडणार आहे.

यंदाच्या वर्षी जिल्ह्यावर सूर्य कोपला आहे. एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यात पारा 39 अंशांपलीकडे जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. परिणामी ग्रामीण जनतेवर पाण्यासाठी दाही दिशा भटकंतीची वेळ आली आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी जनतेकडून टँकरची मागणी होत आहे. तालुकास्तरावरून तसे प्रस्ताव जिल्ह्याच्या मुख्यालयी धडकायला सुरुवात झाली आहे. ग्रामीण जनतेची तहान भागविण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे 15 टँकर धावत आहेत. येवल्यात सर्वाधिक 7 टँकर सुरू आहेत. तसेच चांदवड, देवळा, इगतपुरी तालुक्यातही टँकर सुरू आहेत. याशिवाय येवला, इगतपुरी, चांदवड व अन्य तालुक्यांनीही टँकरचे नवीन 11 प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केले आहेत. या प्रस्तावांना येत्या काही दिवसांत मंजुरी मिळणार असल्याने जिल्ह्यातील टँकरची संख्या 20 च्या वर जाणार आहे.

हेही वाचा:

Back to top button