टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : पोल्ट्रीच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळ्यांना पाहून बिबट्याने चक्क भिंत उकरून आत प्रवेश केला आणि हल्ला केला. यामध्ये दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे मंगळवारी (दि. 14) रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.
शेतकरी रामदास कारभारी घोडे यांनी घराजवळच पोल्ट्रीचे शेड बांधले आहे. त्यामध्ये कोंबड्या नसल्याने त्यांनी तेथे शेळ्या बांधलेल्या होत्या.
शेडसाठी खालच्या बाजूस दोन फुटांचे विटांचे बांधकाम केले असून, त्यावर तारेची जाळी लावलेली आहे. मंगळवारी रात्री शेडमध्ये शिकार दिसल्याने बिबट्याने विटांचे बांधकाम उकरून आत प्रवेश केला व शेळ्यांवर हल्ला केला. यादरम्यान तेथेच झोपलेले घोडे यांच्या कामगारास जाग आली व त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला. मात्र, या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. वन विभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. वन विभागाने पशुधनावरील हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच हल्ले झालेल्या शेतकर्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे यांनी केली.
हेही वाचा