नाशिक : वडांगळी ग्रामपंचायतीला एक कोटी दंडाची नोटीस | पुढारी

नाशिक : वडांगळी ग्रामपंचायतीला एक कोटी दंडाची नोटीस

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील वडांगळी येथील ग्रामपंचायतीने 363 ब्रास वाळूचे अवैधरीत्या उत्खनन करून साठा केल्याप्रकरणी महसूल विभागाने नोटीस बजावली आहे. त्यात सुमारे 1 कोटी 16 लाख 53 हजार 300 रुपये दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

वडांगळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत गट नं. 26/1/1/अ मध्ये अनधिकृतपणे उत्खनन केल्याची माहिती मिळाल्यानंतर देवपूर व वडांगळी येथील मंडळ यांनी 14 मार्च 2023 रोजी स्थळनिरीक्षण पंचनामा केला. याबाबतचा अहवाल सिन्नरच्या तहसीलदारांना सादर केला. त्याचे अवलोकन करता गट नं. 26/1/1/अ चे 77.45 हे. आर क्षेत्र वडांगळी ग्रामपंचायतीच्या नावावर असल्याचे समोर आले. त्यात सुमारे 363 ब्रास इतक्या वाळूचा अवैधरीत्या साठा केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे ग्रामपंचायतीवर दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस तहसीलदारांनी बजावली आहे. तीन दिवसांच्या आत खुलासा प्राप्त न झाल्यास अथवा प्राप्त खुलासा असमर्थनीय असल्यास तरतुदीनुसार दंडात्मक कारवाईचा इशारा नोटिसीत देण्यात आला आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीच्या वतीने नेमका काय खुलासा केला जातो याकडे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतीने इतक्या मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन व साठा केलाच कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, नोटीस माहितीस्तव जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी निफाड यांना पाठविण्यात आल्या आहेत.

खुलासा असमर्थनीय असल्यास मोठा भुर्दंड
दरम्यान, 363 ब्रास वाळूचे सहा हजार रुपये प्रतिब्रास या बाजारभावाप्रमाणे 21 लाख 78 हजार इतकी किंमत होते. बाजारमूल्याच्या पाच पट रक्कम 1 कोटी आठ लाख 90 हजार तसेच रॉयल्टी सहाशे रुपये प्रतिब्रासप्रमाणे 2 लाख 17 हजार 800 त्याचप्रमाणे पाच टक्के प्रमाणे जागाभाडे 5 लाख 44 हजार पाचशे आणि अर्ज फी रुपये 1 हजार याप्रमाणे 1 कोटी 16 लाख 53 हजार तीनशे रुपये दंडात्मक तरतूद करण्यात आल्याचे नोटिसीत नमूद आहे.

स्वामित्व धनाची रक्कम जमा केली नाही
स्वामित्वधनाची रक्कम शासनास जमा न करता गौणखनिजाचे अनधिकृतपणे साठा केला त्यामुळे महसूल जमीन अधिनियम व महाराष्ट्र जमीन संहिता तसेच महाराष्ट्र जमीन महसूल गौणखनिज उत्खनन व ती काढणे या कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाईचा नोटिसीत इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button