नाशिकमधील गुन्हेगारांवर येणार “एमपीडीए’चा ‘अंकुश’ | पुढारी

नाशिकमधील गुन्हेगारांवर येणार "एमपीडीए'चा 'अंकुश'

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात होणाऱ्या प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांसह हाणामारी, शस्त्रांचा वापर करणाऱ्या गुन्ह्यांमध्ये विविध टोळ्यांमधील गुन्हेगारांचा समावेश असल्याचे पोलिस तपासातून समोर येत आहे. त्यामुळे अशा टोळ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमधील संशयितांच्या टोळक्यांविरोधात आता ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. तीन महिन्यांत दोन प्रकरणांना मंजुरी मिळाली असून, आता पंधरा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आले असून, त्यांना परवानगी मिळाल्यास सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई होणार आहे.

शहरात पूर्ववैमनस्यातून गुन्हेगारांनी बंदूक, धारदार शस्त्रांनी वार करून खून, खुनाचा प्रयत्न, दुखापती केल्याचे प्रकार घडले आहेत. काही टोळक्यांनी धारदार शस्त्रांचा वापर करीत परिसरात दहशत पसवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी गुन्हे दाखल करण्यासोबतच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. त्यानुसार सराईतांचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासून कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या कायद्यांतर्गत (एमपीडीए) ही कारवाईदेखील प्रस्तावित केली आहे. या कारवाईनुसार संबंधित संशयितास कारागृहात स्थानबद्ध करता येते. तसेच इतर प्रतिबंधात्मक कारवाईत शहर व जिल्ह्यातून हद्दपार करणे, मोक्का अशा कारवाया प्रस्तावित केल्या जाणार आहेत.

चांगल्या वर्तवणुकीचे बाँड

चांगल्या वर्तवणुकीच्या हमीचे बाँड रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून घेतले जात आहेत. त्यानुसार यावर्षी तीन महिन्यांत ७१५ संशयितांकडून हे बाँड घेण्यात आले आहेत. त्यात कलम १०७ अंतर्गत ६२० जणांवर, कलम १०९ अंतर्गत ५ आणि कलम ११० अंतर्गत ९० संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईचे स्वरूप

चालू वर्षात तीन महिन्यांत शहर पोलिसांनी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, त्यात एमपीडीएअंतर्गत २ कारवाया पूर्ण झाल्या असून, १५ कारवाई प्रस्तावित आहेत. त्याचप्रमाणे ३० जणांना हद्दपार केले आहे. धारदार शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ३४ जणांविरोधात तर इतर शस्त्रे बागळल्याप्रकरणी १० जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button