पुणे : वन्यजीवांकडून शेतीपिकांचे नुकसान | पुढारी

पुणे : वन्यजीवांकडून शेतीपिकांचे नुकसान

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : राख येथील शेरीचा मळा (ता. पुरंदर) परिसरातील सात-आठ शेतकर्‍यांच्या पिकांत रानडुक्कर व हरणांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. हातातोंडाशी आलेली, स्विटकॉर्न, ऊस, ज्वारी, कांदा, मेथी, कोथिंबीर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. राख व परिसर हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. बहुतांश शेतकरी कर्ज काढून शेती करतात. परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून वन्यप्राणी वारंवार पिकांत घुसून नुकसान करीत आहेत. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकर्‍यांना गहिवरून येत आहे. काढलेले कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून, नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करीत आहेत.

राख परिसराच्या तीन दिशेला डोंगर व माळरान असून, गुळूंचे बाजूला उसाचे क्षेत्र जास्त आहे. काही दिवसांपूर्वीच ऊसतोडणी संपल्याने वन्यप्राण्यांचे खाद्य व आडोसा कमी झाला आहे. परिणामी, ते उभ्या पिकांचे नुकसान करीत आहेत. भागामध्ये काही महिन्यांपूर्वीच रानगव्यांचेही दर्शन झाले होते. हिंसक वन्यप्राण्यांकडून वाचण्यासाठी, तसेच पाणी व खाद्य मिळविण्यासाठी, हे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येत आहेत. यामध्ये हरणांच्या कळपांचे मोठे प्रमाण आहे. वाढत्या नुकसानीमुळे वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, नुकसानीची पाहणी करून, नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी लता रणनवरे, मनीषा चव्हाण, सत्वशीला पिसाळ, किसन ताटे आदींनी केली आहे.

Back to top button