अंजीर शेतीतून मिळवले वर्षाकाठी 15 कोटी | पुढारी

अंजीर शेतीतून मिळवले वर्षाकाठी 15 कोटी

रामदास डोंबे : 

खोर : एकेकाळी दौंड तालुक्यातील खोर वांगे नावाने प्रसिद्ध असलेल्या गावाने आता अंजीर क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. खोर परिसरात जवळपास 500 एकरांवर अंजीरशेती असून यंदा तब्बल 15 कोटी रुपयांचे उच्चांकी उत्पादन अंजीर बागायदारांनी घेतले आहे. त्यामुळे खोर गावाची आता अंजीराचे गाव म्हणून नवी ओळख निर्माण झाली आहे. अंजीर शेतीला भौगोलिक मानांकन मिळावे म्हणून येथील बागायदार प्रतीक्षेत आहेत. गेल्या 40 वर्षांपासून खोर भागात अंजीरशेती केली जाते.

येथील हवामान अंजीरशेतीला पोषक आहे. अंजीर बागायतदार हे झाडांना रासायनिक खतांचा वापर न करता जास्तीत जास्त कंपोस्ट खताचा तसेच गांडूळ खताचा वापर करत आहेत. त्यामुळे येथील अंजीरांची चव दर्जेदार व गोड असून त्यांना भारतातील विविध शहरांमधून पहिली पसंती मिळत आहे. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या अधिकार्‍यांची यात महत्त्वाची मदत मिळत आहे. शेतीशाळा घेऊन शेतकर्‍यांना विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे. दरम्यान गावात पवित्रक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाली आहे. या कंपनीमार्फत देखील अंजीर बागायतदारांना मार्गदर्शन तसेच मदत मिळत आहे.

दरम्यान महाराष्ट्र शासनाचे कृषी आयुक्त, सचिव यांसारख्या अनेक अधिकार्‍यांनी गावाला भेटी देत अंजीर शेतीची पाहणी केली आहे. तर भारताच्या कानकोपर्‍यातून शेतकरी माहिती घेण्यासाठी खोर येथे येत आहेत. खोरचे अंजीर तसेच वांग्याला भौगोलिक मानांकन मिळवण्याची प्रक्रिया कृषी खात्याकडून सुरू केलेली आहे. लवकरात लवकर भौगोलिक मानांकन मिळावे, अशी अपेक्षा अंजीर बागायतदार समीर डोंबे यांनी व्यक्त केली.

दौंड तालुक्यातील खोरचे हवामान हे अंजीर शेतीला पूरक आहे. या गावात प्रदूषणविरहित हवा असल्याने दर्जेदार व स्वादिष्ट, गोड असे अंजीर तयार होत आहेत.
                                                            -राहुल माने, कृषी अधिकारी, दौंड

Back to top button