नाशिक : पैसे घेण्या देण्यावरुन वाद; अंबडला दुकानदारावर तलवारीने हल्ला | पुढारी

नाशिक : पैसे घेण्या देण्यावरुन वाद; अंबडला दुकानदारावर तलवारीने हल्ला

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

पान टपरीवर साहित्य खरेदीनंतर पैसे घेण्या देण्यावरुन झालेल्या वादातून टपरी चालकावर धारदार तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना रविवारी (दि.26) अंबडच्या सिमेंस कंपनीसमोर घडली. यानंतर आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर अंबड औद्योगिक वसाहतीत पोलिस चौकीसाठी ग्रामस्थ सोमवारी (दि. 27) सकाळी 9 वाजता गरवारे चौक, येथे रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.

सिमेन्स कंपनीजवळ ज्ञानेश्वर वारुंगसे यांची पान टपरी असून रविवारी (दि. 26) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रिक्षातून आलेल्या तीन ते चार जणांनी खरेदीनंतर सुट्टे पैसे नसल्याने वाद घालत टपरी चालक वारूंगसे यांच्या धारदार तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. टपरी चालकावर हल्ला झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी गर्दी करत संशयितांना बेदम चोप दिला. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक श्रीकात निबांळकर, पोलिस उपनिरीक्षक संदिप पवारसह कर्मचारी पोहोचले.

अंबड पोलिसांनी सिसिटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत घटनेत ग्रामस्थांच्या मारहाणीत जखमी झालेल्या दोन संशयितांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. तर दोन मारेकरी आणि आरोपींना मारहाण करणाऱ्या दोन ग्रामस्थांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अंबड पोलिस ठाणे येथे रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. अंबड परिसरासह औद्योगिक वसाहतीत हाणामारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून पोलिसांचा धाक उरला की नाही असा प्रश्न उपस्थित होत असून ग्रामस्थ साहेबराव दातिर, गोकुळ दातिर, शांताराम फाडोळ आदींनी रास्ता रोको करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा :

Back to top button