क्षणात बदलतोय मराठी नाटकांचा सेट | पुढारी

क्षणात बदलतोय मराठी नाटकांचा सेट

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  एका सेटवर दोन ते तीन लोकेशन्सचा वापर… सेटमध्ये होणारा एलईडी स्क्रीनचा वापर… एखादे ठिकाण दाखविण्यासाठी होणारा फिरत्या सेटचा वापर… अशा पद्धतीने आता क्षणात मराठी नाटकांचे सेटही बदलायला सुरुवात झाली आहे. कारण, मराठी नाटकांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून, खासकरून नेपथ्यकारांकडून नाटकांच्या सेटमध्ये काळानुरूप बदल होत आहेत. नाटकाच्या कथेप्रमाणे हुबेहूब सेट डिझाइन केले जात आहेत आणि सेटमध्ये अगदी अ‍ॅनिमेशनचाही वापर होताना दिसत आहे. फक्त प्रशस्त हॉल किंवा घराच्या खोलीपुरते मर्यादित असलेले नाटकांचे सेट आता जम्मू-काश्मीरचे विलोभनीय लोकेशन, बनारसचा घाट, रेल्वे स्टेशन, एखादी बाग… अशा सेटपर्यंत पोहचले असून, मध्यंतरानंतर दुसरा सेट लावण्याचा ट्रेंडही सुरू झाला आहे.

सध्या मराठी रंगभूमीतही तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर केला जात असून, तंत्रज्ञान वापरणे खर्चीक बाब असली, तरी नाट्य निर्माते-दिग्दर्शक जोखीम घेऊन नाटकांमध्ये तंत्रज्ञानात्मक बदल करीत आहेत. सोमवारी (दि. 27) साजर्‍या होणार्‍या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त दै. ’पुढारी’ने घेतलेला हा बदलांचा आढावा.

ज्येष्ठ नेपथ्यकार सुनील देवळेकर म्हणाले की, कथेला अनुसरून आम्ही सेट डिझाइन करीत आहोत. एका सेटमध्ये दोन ते तीन लोकेशन वापरून सेट तयार केला जातो. फक्त प्रशस्त हॉल किंवा घराच्या खोलीपुरते मर्यादित असलेले नाटकांचे सेट आता जम्मू-काश्मीरचे विलोभनीय लोकेशन, बनारसचा घाट, रेल्वे स्टेशन, एखादी बाग, अशा सेटपर्यंत पोहचले आहे. जशी कथा तसे हुबेहूब सेट बनविले जात असून, आपण प्रत्यक्ष त्याच ठिकाणी असल्याचा भास होतो. त्यादृष्टीने साहित्यांचा वापरही केला जातो.

नाटकांची सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी

नवे असो वा जुने… प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाची प्रसिद्धी नाट्य संस्थांकडून सोशल मीडियाद्वारे केली जात असून, आता तर नाटकांचे टीझरही यायला सुरुवात झाली आहे. नाटकांच्या लहान व्हिडीओद्वारे, छायाचित्रांद्वारेही, रील्सद्वारेही नाटकांची प्रसिद्धी केली आहे. याबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी दीपक रेगे म्हणाले की, अधिकृत संकेतस्थळासह फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टि्वटरच्या माध्यमातून खास पोस्टर्स, छायाचित्रे, व्हिडीओ अन् टीझर्सद्वारे नाट्यप्रयोगांविषयीची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचवली जात आहे. यासाठी सोशल
मीडिया टीम तयार केली असून, नाट्यप्रयोगांच्या तारखा, नवीन नाटकांची प्रसिद्धीही करण्यात येत आहे.

नवीन व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांमध्ये तर एका सेटवर दोन-तीन लोकेशन्स, एलईडी स्क्रीनचा वापर, त्या पद्धतीने प्रकाशयोजनेचा आणि बॅक ग्राउंड संगीत वापरले जात आहे. नाट्यनिर्मात्यांसाठी ही खर्चीक बाब असली, तरी काही जण तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. आम्हीसुद्धा ’चिरंजीव आईस’ या नाटकासाठी असा सेट वापरत असून, त्यात आम्ही बाग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. खासकरून सेटमध्ये आता नवेपणा, ताजेपणा आला आहे.
                                                       – भाग्यश्री देसाई, नाट्यनिर्माते

Back to top button