नाशिक : लहवितला माजी सैनिकांच्या घरी चोरी; 25 तोळे सोन्यासह एक लाखाची रक्कम लंपास | पुढारी

नाशिक : लहवितला माजी सैनिकांच्या घरी चोरी; 25 तोळे सोन्यासह एक लाखाची रक्कम लंपास

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
लहवित येथील माजी सैनिकांचे कुटुंब सांजेगाव येथे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गेले असल्याच्या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडीकोयंडा तोडून कपाटातील 25 तोळे सोने व एक लाख रुपये रोख चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लहवित येथील जनता विद्यालयामागे माजी सैनिक सुरेश तुकाराम मुठाळ हे आई पत्नी दोन मुलांसह राहात असुन सुरेश मुठाळ हे लष्कारातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सैनिक विभागातील डि ऐ सी विभागात बॅंगलोर येथे कार्यरत आहेत. ते काही दिवसांपूर्वीच सुट्टीवर आले होते. तर सुट्टी संपल्याने ते गुरुवार दि 9 रोजी ड्युटीवर रुजु होण्यासाठी बॅंगलोर येथे रवाना झाले. त्यांची आई, पत्नी व दोन मुले घरीच होते. शनिवार (दि.11) रोजी सायंकाळी सर्व कुटुंब इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथे नातेवाईकांच्या घरी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रविवार (दि.12) रोजी सकाळी हे कुटुंब घरी आले असता घराचा कडीकोयंडा तुटलेला तर सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले कपाटाचे लाॅक तोडून त्यातील सोन्याची पोत, कर्णफुले, अंगठी  इतर सोन्याच्या वस्तू असे एकुण 25 तोळे सोन्याची दागिने व एक लाख रुपये रोख चोरुन नेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने घटनेची माहिती देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात देवून तक्रार दाखल केली. सहायक पोलिस आयुक्त अंबादास भुसारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव, पोलिस कर्मचारी गुन्हे शोध पथकातील अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल होत श्र्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. त्यांनी एअर फोर्स रस्त्यापर्यंत मार्ग दाखविला असून देवळाली कॅम्प पोलिस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा:

Back to top button