पिंपरी : संवेदनशील मतदान केंद्रांवर लक्ष द्या ; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचना | पुढारी

पिंपरी : संवेदनशील मतदान केंद्रांवर लक्ष द्या ; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचना

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचे प्रशासकीय कामकाज नियोजनबद्ध होत आहे. मतदारसंघातील संवेदनशील व असुरक्षित मतदान केंद्रांवर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. या पोटनिवडणुकीमध्ये निवडणूक कामकाज सोपविण्यात आलेल्या सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी वेळ, समन्वय आणि संवाद यांचा मेळ साधून काळजीपूर्वक आपली जबाबदारी पार पाडावी, अशी सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक त्या सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश देखील त्यांनी या वेळी दिले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार (दि. 11) थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पोलिस प्रशासन, निवडणूक समन्वय अधिकारी आणि सेक्टर अधिकारी यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण, निवडणूक पोलिस निरीक्षक अनिल किशोर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख होते. त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी बैठकीत विविध कामकाजाची माहिती दिली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शीतल वाकडे, शिरीष पोरेडी, निवडणूक सहाय्यक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, निवडणूक कक्ष अधिकारी प्रशांत शिंपी, आचारसंहिता कक्षाचे प्रमुख आबासाहेब ढवळे, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह सेक्टर ऑफिसर तसेच विविध पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांनी स्ट्राँग रूमची तयारी, पोस्टल मतदान, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था आदी विविध विषयांचा आढावा घेतला.

आचारसंहितेचा भंग होऊ नये
डॉ. राजेश देशमुख म्हणाले की, सध्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असून तिचा भंग होऊ नये यासाठी नेमण्यात आलेल्या सर्व यंत्रणेने सजग राहणे महत्वाचे आहे. निवडणुकीसाठी नेमलेल्या प्रत्येक पथकाने आपली जबाबदारी काटेकोर पार पाडावी. विशेषतः पोलिस यंत्रणेची भूमिका कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाची आहे. सर्व यंत्रणांनी आपापसांत समन्वय ठेऊन कामकाज करावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहतूक नियोजन आराखडा तयार करून त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राहील, यावर विशेष लक्ष द्यावे. ईव्हीएम यंत्र स्थलांतरीत करताना योग्य काळजी घेऊन या प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करावे. ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन ही संवेदनशील बाब आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनांचे त्या दृष्टीने तंतोतंत पालन झाले पाहिजे, अशा सूचनाही डॉ. देशमुख यांनी केल्या.

Back to top button