नाशिक : पोलीसांच्या मदतीने अंध वयोवृध्दा सुखरुप पोहचली घरी | पुढारी

नाशिक : पोलीसांच्या मदतीने अंध वयोवृध्दा सुखरुप पोहचली घरी

नाशिक (देवळा):  पुढारी वृत्तसेवा

देवळा येथे दोन दिवसांपासून रागाच्या भरात वयोवृद्ध महिलेला तिच्या राहत्या घरी मुलाकडे सुखरूप पोहचविण्याचे काम येथील पोलीस हवालदार विजय सोनवणे यांनी केल्याने सद्रक्षणाय खलनिग्रहणाय पोलीस खात्याची ब्रीद वाक्याची जाणीव झाली.

देवळा येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी एक 80 वर्षाची वयोवृद्ध अंध महिला सुनेच्या मारहाणीमुळे रागाच्या भरात घरातून निघून आली होती. पहिल्या दिवशी ही महिला येथील हनुमान मंदिराच्या आवारात वास्तव्यास होती. त्यानंतर भटकत ती किशोरनगरमध्ये असलेल्या पीठगिरणी जवळ आली. यावेळी त्याठिकाणी उपस्थित सरिता केदारे व ज्योती अहिरे यांना जवळच असलेल्या विहिरीजवळ वृध्द अंध  महिला आढळून आली. त्यांनी महिलेबाबतची माहिती डॉ. कृष्णा अहिरे यांना दिली. त्यांनी विकी सोनवणे यांना त्याठिकाणी बोलावून घेतले. महिलेची चौकशी केली असता देवळा पोलीस हवालदार विजय सोनवणे यांना देखील माहिती देण्यात आली. सोनवणे व डॉ. कृष्णा अहिरे, विकी सोनवणे, विशाल शिरसाट, विशाल चव्हाण, मेहुल मोरे यांनी महीलेचा पत्ता शोधून तिच्या मुलाला यांसदर्भात माहिती दिली. त्यानंतर मुलाला बोलावून त्यांनी अंध आजीबाईला तिच्या ओतूर कुंडाने ता. कळवण येथील मुलाच्या स्वाधीन केले. यावेळी हवालदार सोनवणे यांनी वयोवृद्ध महिलेला साडी, चोळी घेऊन दिली. या महिलेचा मुलगा आईला दुचाकीने घरी घेऊन जात असतांना पाहताच उपस्थितांचे डोळे पाणावले. या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

हेही वाचा:

Back to top button