पिंपरी : मिरचीचा ठसका झाला कमी आवक वाढल्याने दर उतरले | पुढारी

पिंपरी : मिरचीचा ठसका झाला कमी आवक वाढल्याने दर उतरले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : लाल मिरचीचे दर कडाडल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. मात्र, आता मिरचीची आवक वाढली आहे. त्यामुळे मिरचीच्या दरात झालेला भडका आता  ओसरला आहे. पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई, तसेच शहराच्या इतर भागात आंध्र प्रदेश येथून लाल मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात होते. मात्र, या वेळी नवरात्रीनंतरच्या ऐन हंगामात पाऊस पडल्यामुळे मिरचीच्या पिकाचे नुकसान झाले. परिणामी बाजारात मिरचीची आवक घटली होती. त्याकारणाने मिरचीच्या दरात वाढ होऊन सर्वसामान्यांना मिरचीची ठसका बसून, ग्राहकांनी मिरचीकडे पाठ फिरवली होती.

तीन-चार महिन्यांनंतर आता आंध्र प्रदेशामधून मिरचीची आवक वाढल्याने दरात पन्नास ते दोनशे रुपयांची घट झाली असून, दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. काश्मिरी मिरचीच्या पिकाचे उत्पादन येण्यास महिनाभराचा कालावधी आहे. जास्त रंगीत असलेली मात्र चवीला तिखट नसलेली अशी ही मिरची आहे. त्यामुळे हॉटेल्स, मेसमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

 

मिरचीचे दर कमी झाल्याने ग्राहकांची खरेदी वाढली आहे. मकरसंक्रांतीनंतर घरोघरी मसाला बनविण्यास सुरुवात होते. आठवडाभरात आवक वाढली असून दरात घट झाली आहे. परिणामी एरवीपेक्षा वीस ते तीस टक्के खरेदी वाढली आहे.
                                               – पंकज सावदेकर,  विक्रेता, पिंपरी.

 

Back to top button