पिंपरी : वडगावचे ग्रामदैवत पोटोबा महाराज देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा | पुढारी

पिंपरी : वडगावचे ग्रामदैवत पोटोबा महाराज देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थानला पुणे जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत ‘क’ वर्ग तीर्थस्थळाच्या दर्जा देण्यात आला. दरम्यान, वडगावकर नागरिक व भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीची आढावा आणि नियोजन बैठक शुक्रवार दि.27 रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या वेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, नियोजन समितीचे सदस्य माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे, शरद हुलावळे उपस्थित होते.

या बैठकीत मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेले वडगांव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान व तळेगांव दाभाडे शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज देवस्थान या दोन्ही तीर्थ स्थळांना जिल्हा नियोजन समितीने ‘क’वर्ग तीर्थक्षेत्र स्थळाचा दर्जा दिला. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी तुकाराम महाराज भंडारा ट्रस्ट आणि संत श्री जगनाडे महाराज समाधी परिसर सुदुंबरे तीर्थक्षेत्र आराखडा शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले. धार्मिक स्थळांचा समावेश हा अ, ब व क वर्ग अशा तीन प्रकारच्या वर्गात होतो, ’क’ श्रेणीत जिल्हास्तरावर स्थानिक महत्त्व असलेली ठिकाणांना निर्देशित करण्यात येतात.  जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या मदतीने अशा ठिकाणांना निधी दिला जातो. त्यामुळे वडगाव मावळ व तळेगाव दाभाडे येथील देवस्थानांचा आगामी काळात विकास होण्यास मदत होणार आहे.

गेल्या तीन वर्षांपासून देवस्थानला तीर्थस्थळाचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही सर्व विश्वस्त सातत्याने पाठपुरावा करत होतो. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, खासदार श्रीरंग बारणे यांनी यासाठी विशेष सहकार्य केले त्यामुळे प्रयत्नांना यश आले असून, या यशामध्ये दिवंगत माजी आमदार दिगंबर भेगडे, आमदार सुनील शेळके यांसह सर्व लोकप्रतिनिधी, सर्व प्रशासकीय अधिकारी यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे.
      -श्री. सोपानराव म्हाळसकर, मुख्य विश्वस्त, श्री पोटोबा महाराज देवस्थान.

Back to top button