नाशिक : विधवेशी लग्न करा अन् कोट्यधीश व्हा! | पुढारी

नाशिक : विधवेशी लग्न करा अन् कोट्यधीश व्हा!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तंत्रज्ञानाच्या आधारे एखाद्यास फसविणे खूपच सोपे झाल्याने वेगवेगळे फंडे वापरून नागरिकांना गंडा घालण्याचा प्रकार नित्यनियमाने सुरू असतो. सध्या बनवेगिरीचा असाच एक नवा फंडा सोशल मीडियावर विशेषत: फेसबुकवर बघावयास मिळत असून, आतापर्यंत त्यास अनेक जण बळी पडले आहेत. एक विधवा तरुणी अन् तिच्यासोबत एक महिला असलेला फेसबुकवर हमखास बघावयास मिळत असून, या विधवा महिलेशी लग्न करा अन् कोट्यधीश व्हा, असे या व्हिडिओमधून ही महिला सांगताना दिसून येते. नेटिझन्सदेखील त्यास प्रतिसाद देत आपला मोबाइल नंबर त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करतात अन् जाळ्यात ओढले जात असल्याचे समोर येत आहे.

खरं तर सोशल मीडियावरून फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार नेहमीच समोर येत असतात. मग लॉटरी असो वा हनी ट्रॅप असो याचा अनेकांना फटका बसला आहे. आता हा फंडा अनेकांच्या लक्षात आल्याने, आता लग्नाच्या व्हिडिओचा नवा प्रकार समोर आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून नेटिझन्सना विशेषत: तरुणांना जाळ्यात अडकविले जात आहे. सध्या याबाबतचे अनेक व्हिडिओ फेसबुकवर मोठ्या प्रमाणात बघावयास मिळतात. या व्हिडिओमध्ये दोन महिला दिसून येतात. त्यातील एक तरुणी विधवा असल्याचे दाखविले जाते. तर दुसरी वयोवृद्ध महिला नेटिझन्सना तिच्याशी लग्न करण्याचे आवाहन करताना दिसते. त्यामध्ये ती म्हणते की, ‘ही तरुणी विधवा आहे, तिच्या पतीचे नुकतेच कार अपघातात निधन झाले आहे. त्याच्यापासून ही दोन महिन्याची गर्भवतीदेखील आहे. मात्र, तिची कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे जो कोणी तिच्याशी लग्न करणार त्याला ती प्रॉपर्टी दिली जाईल. त्यामध्ये कार, फ्लॅट, रोकड, सोने असे सर्व काही त्याला दिले जाईल. शिवाय या सुंदर मुलीशी लग्न केले जाईल. त्यामुळे हिच्याशी लग्न करण्यास जो कोणी उत्सुक आहे, त्याने आपला मोबाइल क्रमांक कमेंटस् बॉक्समध्ये शेअर करावा, आम्ही त्याला योग्य वेळी संपर्क करू, असे आवाहन या महिलेकडून केले जाते.

विशेष बाब म्हणजे तरुणदेखील कमेंट बॉक्समध्ये नंबर शेअर करतात. त्यानंतर या भामट्यांकडून त्या मोबाइल नंबरवर संपर्क साधून त्या तरुणाची विचारपूस केली जाते. जवळपास दोन ते तीन दिवस त्या तरुणाला सातत्याने या ना त्या कारणाने संपर्क साधला जातो. त्या तरुणाचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याच्याकडे पैशांची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास त्याला धमाकवलेदेखील जाते. अशा पद्धतीने तरुणांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार सध्या समोर येताना दिसत आहेत.

सातपूरमधील तरुणाची फसवणूक…

सातपूरमधील एक अविवाहित तरुण अशाच प्रकारे या व्हिडिओच्या जळ्यात अडकला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून त्याला तरुणीचे फोन येत असून, आता त्याच्याकडे पैशांची मागणी केली जात आहे. माझे घर पतीच्या नावावर असून, ते घर आपल्या दोघांच्या नावावर करायचे आहे. त्याकरिता ५० ते ६० हजार रुपये खर्च येणार आहे. माझ्याकडे सध्या तेवढे पैसे नाहीत, कारण जे पैसे आहेत ते पतीच्या अकाउंटमध्ये आहेत. माझ्या खात्यावर येण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे. अशात तू मला आता पैसे दे, लग्नानंतर हे सर्व काही तुझेच होणार आहे, अशा प्रकारचे आमिष या तरुणाला दाखविले जात आहे. दरम्यान, आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने आता त्याला धमकीचे फोन येत आहेत.

हेही वाचा:

Back to top button