नाशिक : मनमाडकरांनी अनुभवली रेड्यांची टक्कर, दिवाळीनिमित्त शेकडो वर्षांची परंपरा | पुढारी

नाशिक : मनमाडकरांनी अनुभवली रेड्यांची टक्कर, दिवाळीनिमित्त शेकडो वर्षांची परंपरा

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा

दिवाळीच्यावेळी मनमाडला गवळी समाजात पाडव्याला रेड्यांची वाजतगाजत मिरवणूक काढल्यानंतर भाऊबीजच्या दिवशी त्यांची झुंज लावण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर ही परंपरा पाळत गवळी समाज व शहर दुध संघातर्फे रेड्यांची झुंज आयोजित करण्यात आली होती. त्यात शहर परिसरासह इतर तालुक्यातील अनेक गवळी बांधव रेडे घेवून आले होते. रेड्यांच्या झुंजीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

दिन दिन दिवाळी गाई- म्हशी ओवाळी अशी म्हण प्रचलित आहे. पशुधनाची पूजा करून त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करण्याची आपली संस्कृती आहे. मनमाड शहर परिसरासह ग्रामीण भागात गवळी समाजाची मोठी संख्या असून पाडव्याच्या दिवशी गवळी बांधवानी त्यांच्या रेड्याला आकर्षक पद्धतीने सजवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढून त्याला लक्ष्मी मातेसोबत इतर मंदिरात देवदर्शनाला घेऊन आले होते. दरवर्षी भाऊबीजेच्या दिवशी गवळी समाज व शहर दुध संघातर्फे रेड्यांची झुंज आयोजित केली जात होती. मात्र यंदा भाऊबीजेच्या दोन दिवसानंतर शहरातील महर्षी वाल्मिकी स्टेडियमच्या मैदानावर रेड्यांची झुंज आयोजित करण्यात आली होती. त्यात भाग घेण्यासाठी शहर परिसर आणि ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने गवळी बांधव त्यांचे रेडे घेवून आले होते. टकरीत जिंकलेल्या रेड्याच्या मालकाला एक हजार पासून अकरा हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच रेड्यांच्या मालकांचाही दूध संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

रेड्यांच्या झुंजीचा थरार पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. जोपर्यंत आम्ही रेड्यांची झुंज लावत नाही तोपर्यंत आमची दिवाळी साजरी होत नाही, असे गवळी बांधवानी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button