नाशिकच्या दोघांचा 37 दिवसांत सहा हजार किमी सायकल प्रवास | पुढारी

नाशिकच्या दोघांचा 37 दिवसांत सहा हजार किमी सायकल प्रवास

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नरचे भूमिपुत्र सागर संतोष गुंजाळ (रा. सुळेवाडी) व वैभव शिंदे (रा. तामसवाडी. ता. निफाड) या युवकांनी सिन्नर-नाशिक-लेहलडाख-मनाली – मुंबई- नाशिक-सिन्नर असा 6000 किमीचा सायकल प्रवास 37 दिवसांत पूर्ण केला. त्यांनी हा प्रवास सायकलवर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

परिस्थिती गरीब असल्यामुळे या दोघा युवकांनी सायकलवरून कॉलेजमध्ये जावे लागत असे. त्यामुळे त्यांचे मित्र त्यांना हसायचे. मग त्यानी निश्चय केला की या सायकलवर आपण असा पराक्रम करू की सर्वांना सायकलवर प्रवास केल्याचा अभिमान व कौतुक वाटले पाहिजे. त्या जिद्दीतून, अनेक अडचणींवर मात करत त्यांनी हा अवघड पल्ला गाठला. या प्रवासात त्यांना बर्‍याचदा दिवस-रात्र प्रवास करावा लागला.

त्यांच्या या कामगिरीबद्दल सिन्नर सायकलिस्टने त्यांचा सत्कार आयोजित केला. यावेळी सिन्नर सायकलिस्टचे अध्यक्ष नितीन जाधव, उपाध्यक्ष संदीप ठोक, डॉ. भानुदास आरोटे, मुकेश चव्हाणके, रामभाऊ लोणारे. डॉ. विनोद घोलप, सुनील ढाणे, भास्कर गोजरे, सोपान परदेशी, डॉ. सोपान दिघे तसेच सागरचे आजोबा मुरलीधर गुंजाळ उपस्थित होते.

सागर व वैभव यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थिती हा यशस्वी प्रवास केलेला आहे. त्यांनी यापुढे असे प्रवास करताना ग्रीनिज, लिम्का बुकमध्ये कळवून त्यांच्या सूचनेनुसार राइड केली तर निश्चितच नोंद होईल. यापुढे सिन्नर सायकलिस्टमध्ये ते सहभागी होऊन निश्चितच सिन्नर सायकलिस्टचे पण नाव उंचावतील ही अपेक्षा आहे.
– नितीन जाधव,
अध्यक्ष, सिन्नर सायकलिस्ट

हेही वाचा :

Back to top button