पंतप्रधानांनी मांडली ‘एक देश, एक पोलीस वर्दी’ ची संकल्पना | पुढारी

पंतप्रधानांनी मांडली 'एक देश, एक पोलीस वर्दी' ची संकल्पना

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली फरिदाबाद येथील सुरजकुंड परिसरात सुरू असलेल्या गृह मंत्र्यांच्या चिंतन शिबिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी त्‍यांनी ‘एक राष्ट्र, एक पोलीस वर्दी’ ची संकल्पना मांडली. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी या संकल्पनेच्या पुर्ततेच्या शक्यता संबंधी चर्चा करण्याचे देखील पंतप्रधानांनी सूचवले. संबोधनातून पंतप्रधानांनी केंद्रीय तपास यंत्रणांना राज्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले. अनेक राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांना तपास करण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते, यावर बोट ठेवत पंतप्रधानांनी हे सूचक आवाहन केले.

पंतप्रधान म्हणाले, अनेकदा केंद्रीय तपास यंत्रणांना विविध राज्यांमध्ये एकत्रित तपास करावा लागतो. दुसऱ्या देशांमध्ये देखील जावे लागते. यामुळे प्रत्येक राज्यांचे दायित्व आहे की, राज्यांची अथवा केंद्राची एजेन्सी, सर्व एजेन्सींना एक दुसऱ्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. सायबर क्राईम असो अथवा ड्रोन टेक्नोलॉजीचा हत्यार आणि अंमली पदार्थांच्या तस्करीत केला जाणारा वापर रोखण्यासाठी आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीवर काम करावे लागेल. स्मार्ट टेक्नोलॉजीमुळे कायदा-सुव्यवस्था स्मार्ट बनवता येईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. देशवासियांच्या मनात एनडीआरएफ बद्दल सन्मान आहे. आपत्तीच्या वेळी एनडीआरएफ-एसडीआरएफच्या टीम पोहचताच नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळते, अशी भावना व्यक्त करीत पंतप्रधानांनी केंद्रीय यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

गृहमंत्र्यांचे चिंतन शिबीर सहकारी संघवादाचे एक उत्तम उदाहरण आहे. राज्यांनी एकमेकांपासून शिकावे, प्रेरणा घ्यावी, देशाच्या भल्यासाठी कार्यरत राहावे, हीच संविधानाची भावना असून, देशवासियांबद्दलचे आपले दायित्व असल्याचे पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक राज्यांनी एकमेकांचे चांगले काम आत्मसात केले पाहिजे. देशासाठी मिळून काम केले पाहिजे, अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसंबंधी हे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आठ राज्याचे मुख्यमंत्री तसेच १६ राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

देशात उत्सवाचे वातावरण आहे. ओणम, दसरा, दुर्गापूजा, दिवाळीसह अनेक उत्सव शांती तसेच सौहार्दपूर्ण वातावरणात देशवासियांनी साजरा केले आहेत. आता छठ पूजेसह इतर सण आहेत. विविध आव्हानांमध्ये देशाच्या एकतेचे सशक्तीकरण आपल्या सर्वांच्या तयारीचे प्रतिबिंब आहे, असे पंतप्रधान म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतकाळ आपल्या समोर आहे. येणाऱ्या २५ वर्षांमध्ये देशात एक अमृत पीढीच्या निर्माणाचा हा काळ आहे. ही अमृत पीढी पंच प्राणांच्या संकल्पांना धारण करीत निर्माण होईल.

कायदा-सुव्यवस्थेचे दायित्व घटनेनूसार राज्यांकडे असले तरी ते देशाच्या एकता तसेच अखंडतेसोबत तेवढेचे जुळले असल्याचे पंतप्रधान म्हणाले.विकसित भारताचे निर्माण, गुलामगिरीच्या प्रत्येक विचारापासून मुक्तता,वारसावरील गर्व, एकता, नागरिकांचे कर्तव्य या पंच प्राणांच्या महत्वाला ओळखून हा एक विराट संकल्प असून प्रत्येकांच्या प्रयत्नांनी तो सिद्ध केला जावू शकतो, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. देशाचे सामर्थ्य वाढले तेव्हाच देशातील प्रत्येक नागरीक, प्रत्येक कुटुंबियांचे सामर्थ्य वाढेल. हेच सुशासन असून, याचा लाभ देशाच्या प्रत्येक राज्यांना समाजाच्या शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्ती पर्यंत पोहचवेल. यात आपल्या सर्वांची भूमिका बरीच मोठी असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

 

हेही वाचा :  

Back to top button