जे निवडणुकांना सामोरे जाण्यास घाबरतात ते बाहेरच्या राज्यातून उद्योग काय आणणार: आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका | पुढारी

जे निवडणुकांना सामोरे जाण्यास घाबरतात ते बाहेरच्या राज्यातून उद्योग काय आणणार: आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

पुणे; पुढारी वृत्तसेवा: माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची आज पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर मत व्यक्त केलं. यात प्रामुख्यानं शहरातील अवकाळी पावसाने झालेली पूरग्रस्त परिस्थिती व उपाय योजना, पुण्याचा रिव्हर फ्रंट विकास, पर्यावरण आणि शहरीकरण या विषयावर चर्चा केली.

पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना सत्ताधाऱ्यांबद्दल छेडलं असता ते म्हणाले, या खोके सरकारनं एकही उद्योग राज्यात ठेवला नाही. आपले मुख्यमंत्री दहीहंडी, राजकीय भेटी घेण्यात गुंग आहेत. दुसऱ्या राज्यात जाऊन महाराष्ट्रासाठी काहीही आणलेलं नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांचं एक इंजिन तरी फेल का होतं. त्यापेक्षा तर आमचंच केंद्रासोबत चांगलं चाललं होत. आमच्या सरकार असताना केंद्राकडून कोविडच्या काळात साडेसहा हजार कोटी आणले.

ते पुढे म्हणले, दोन चायनीज कंपनी सोबतचं काम थांबवलं. कृषिमंत्री कोण शेतकऱ्यांना माहीत नाही, उद्योजकानां उद्योग मंत्री माहीत नाही या राज्यात चाललं आहे तरी काय असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. महाविकास आघाडी सरकार असताना कोरोनाच्या काळातही 6 लाख कोटींचे उद्योग आम्ही आणले. केंद्राशी चर्चा करून आम्ही एअर बस प्रकल्प आणू म्हणून आधी सांगितलं, यासंदर्भात आता उद्योग मंत्री खोटे बोलत आहेत.

Back to top button