महाश्रामणेर : मन शुद्धीसाठी आर्य उपोसथानाचे पालन आवश्यक – भन्ते नागसेन | पुढारी

महाश्रामणेर : मन शुद्धीसाठी आर्य उपोसथानाचे पालन आवश्यक - भन्ते नागसेन

सिडको : पुढारी वृत्तसेवा

अ. भा. समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आयोजित महाबौद्ध धम्म मेळावा आणि महाश्रामणेर शिबिरात शुक्रवारी (दि.३०) सकाळच्या सत्रात भन्ते नागसेन यांनी धम्मदेशना दिली. यात भगवान बुध्दांनी उपदेशिलेले उपोसथाचे तीन प्रकार सांगितले. तसेच आर्य उपोसथाचे पालन केल्यास मनाचे क्लेश नष्ट होऊन मन पवित्र, शुध्द, निर्मळ बनते असे सांगितले. यावेळी उपोसथ कधी व कसे करावे याबाबत माहिती त्यांनी दिली.

भन्ते नागसेन म्हणाले की, तथगात बुध्दांनी सांगितलेेले उपोसथ व्रत हे तीन प्रकारचे असते. यात गोपाल उपोसथ, निगंठ उपोसथ आणि आर्य उपोसथ या तीन प्रकारांचा समावेश आहे. मन हे दु:खाचे कारण आहे. त्यामुळे मनाला क्रमाक्रमाने साफ- स्वच्छ करावे लागते. आर्य आपल्या मलीन मनाला शुध्द करण्याकरिता बुध्दानुस्मृती, धम्मानुस्मृती, संघानुस्मृती, शीलानुस्मृती करतो, या प्रकारे त्रिरत्नाच्या गुणाचे स्मरण करणाऱ्याचे मन प्रसन्न होते. तसेच प्रत्येक महिन्याची पौर्णिमा, अमावास्या प्रत्येक पक्षातील अष्टमीला अष्टांगयुक्त उपोसथ करावे असे अवाहन त्यांनी केले. हिंसा करू नका, चोरी करू नका, ब्रह्मचर्याचे पालन करा, खोटे बोलू नका, मादक पदार्थांचे सेवन करू नका आदींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, भदन्त बोधीपाल, भदन्त धम्मरत्न, भदन्त सुगत, भदन्त आर्यनाग, भदन्त शीलरत्न भन्ते कौण्डिण्य, भन्ते धम्मबोधी आदींसह देशभरातील विविध भदन्त व भिक्खूगण उपस्थित होते. याप्रसंगी बीएमए ग्रुपचे अध्यक्ष व आयोजक मोहन आढांगळे, बाळासाहेब सिरसाट, पी. डी. खरे, रमेश बनसोड, प्रदीप पोळ, राहुल बच्छाव, के. के. बच्छाव, गुणवंत वाघ, धीरज जाधव, रत्नमाला लोंढे, बाळासाहेब शिरसाठ, अशोक गवई, नितीन मोरे, अरुण काशीद, चंद्रकांत गायकवाड, शिवाजी गायकवाड, वाय. डी. लोखंडे, डी. एम. वाकळे, अशोक गांगुर्डे, संदेश पगारे, सोमनाथ शार्दुल, संजय नेटावदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button