‘शिवप्रताप–गरुडझेप’ चित्रपटाचे पाच शहरांत दिमाखदार प्रीमियर | पुढारी

‘शिवप्रताप–गरुडझेप’ चित्रपटाचे पाच शहरांत दिमाखदार प्रीमियर

पुढारी ऑनलाईन : डॉ. अमोल कोल्हे यांचा बहुचर्चित ‘शिवप्रताप–गरुडझेप’ चित्रपट विजयादशमीच्या मुहुर्तावर ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेचा थरार दाखवणाऱ्या या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शनाआधी या चित्रपटाचे ५ शहरात ‘विशेष प्रीमियर शो’ आयोजित करण्यात आले आहेत. या चित्रपटाच्या भव्यतेप्रमाणेच प्रीमियरची भव्य तयारी करण्यात आलेली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, बेळगाव या पाच महत्त्वाच्या शहरात हे प्रीमियर संपन्न होणार आहेत.

नाशिकच्या सिटी सेंटर येथे शनिवार १ ऑक्टोबरला सायं ७.०० वा., सिटीप्राइड कोथरुड, पुणे येथे रविवार २ ऑक्टोबरला सायं ७.०० वा., कोल्हापूर आयनॉक्स येथे सोमवार ३ ऑक्टोबरला सायं ७.०० वा., बेळगाव आयनॉक्स येथे मंगळवार ४ ऑक्टोबरला सायं ७.०० वा. तर दसऱ्याला ५ ऑक्टोबरला मुंबईत अंधेरी येथील इन्फिनिटी रात्री ८.०० वा. हे दिमाखदार प्रीमियर रंगणार आहे. चित्रपटातील कलाकारांच्या टीमसोबत विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या खास शो साठी राहणार आहे.

‘आग्र्याहून सुटका’ हा शिवचरित्रातील हा महत्त्वाचा अध्याय ‘शिवप्रताप–गरुडझेप’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असून त्यांच्यासोबत यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीय, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.

डॉ. अमोल कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर, कार्तिक राजाराम केंढे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रफुल्ल तावरे यांनी सहनिर्माते आहेत. तर रविंद्र मानकामे कार्यकारी निर्माते आहेत. छायाचित्रण संजय जाधव यांचे असून संकलन पीटर गुंड्रा यांनी केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button