नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एसएमबीटी हॉस्पिटलच्या हार्ट इन्स्टिट्यूटमधील हृदयविकार तज्ज्ञांनी नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. गेल्या सात वर्षांत तब्बल १८ हजार ४८९ पेक्षा अधिक हृदयविकार शस्त्रक्रिया या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत केल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर्स २४ तास सेवा बजावत आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत या ठिकाणी अवघड व जटील शस्त्रक्रिया या ठिकाणी यशस्वी झाल्या असून, अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व नगर जिल्ह्यांसह ठाणे आणि पालघरमधील रुग्णांची मोठी गर्दी रुग्णालयात होत आहे. येथे आलेल्या रुग्णांवर योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार केले जातात. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये हार्ट इन्स्टिट्यूट हा पूर्णपणे स्वतंत्र विभाग आहे. येथे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पूर्णवेळ कार्यरत असते. या इन्स्टिट्यूटमधील उपलब्ध सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय उपकरणे याचा हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर्स हे प्रत्यक्ष आणि प्रभावी वापर करतात.
असे होते हृदयरोगाचे निदान
चेस्ट एक्स-रे, ईसीजी, कोरोनरी एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट आणि कार्डियाक एमआरआय आदी तपासण्या केल्यानंतर हृदयरोगाचे निदान होते. हृदयाची झडप बदलणे आणि हृदयाची झडप दुरुस्त करणे अशा दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. लहान बालकांच्या हृदयाची झडप दुरुस्त करण्याला प्राधान्य दिले जाते, जेणे करून भविष्यात ते चांगले जीवन जगू शकतील, असाही प्रयत्न एसएमबीटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा असतो.