नाशिक : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची परवानगी रद्द | पुढारी

नाशिक : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची परवानगी रद्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर रोडवरील बॉस्को सेंटर इमारतीमधील दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावरील डॉ. अनिल कासलीवाल यांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची परवानगी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने रद्द केली आहे. तसेच याच प्रकरणी माजी नगरसेवक अनिल चौघुले यांनी संबंधित जागेसंदर्भात करार प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गंगापूर रोडवरील स.क्र. 713 व 714 पैकी फायनल प्लॉट क्र. 1 व 2 च्या अंतिम भूखंड 454 या मिळकतीवर बॉस्को सेंटर उभारण्यात आले आहे. या इमारतीच्या अ विंगमधील दुसरा व तिसरा तसेच टेरेस आणि तळमजल्यावरील एक लॉबी आणि दोन लिफ्ट असे एकूण 21 हजार 320 चौ. फू. बांधीव क्षेत्र अनिल चौघुले यांना व्यवसायाकरिता 2015 पर्यंत करारावर देण्यात आले होते. चौघुले यांच्या म्हणण्यानुसार, 2016 पर्यंत ते परदेशात गेल्याने मे. जॅझ डेव्हलपर्सने डॉ. अनिल कासलीवाल, विशाल कासलीवाल, प्रियंका कासलीवाल यांच्या नावे चौघुले यांच्या नावावर असलेल्या जागेचा करार केला. करार झालेल्या जागेवर कासलीवाल यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले. पूर्वीचा करार असताना नवीन करार करण्यात आला तसेच महापालिकेच्या नगररचना विभागाने संबंधित इमारतीचे मजले अधिकृत करताना वैद्यकीय विभागानेदेखील रुग्णालय परवानगीचा दाखला दिला. दरम्यान, चौघुले यांनी तक्रार केल्यानंतर वैद्यकीय विभागाने कासलीवाल रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावरील रुग्णालयाचा ना हरकत दाखला रद्द केला आहे. तसेच याबाबत चौघुले यांनी जून महिन्यात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता मनपाचा नगररचना विभाग आता पुढे काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून आहे.

हेही वाचा:

Back to top button