पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील प्रशासन व लेखापरीक्षण विभागातील अधिकारी व कर्मचार्यांच्या विभागीय सहकार खात्यातील कर्मचारी सहकारी पतसंस्थेने सन 2021-22 करिता सभासदांना 12% लाभांश जाहीर केला आहे. विभागीय सहकार खात्यातील कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात रविवारी (दि.18) जिल्हा बँकेच्या सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष व सहकार उपनिबंधक चंद्रकांत टिकुळे हे होते.
यावेळी सहकार आयुक्तालयातील सह निबंधक तान्हाजी कवडे, जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) मिलींद सोबले, राज्य कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, सहकारचे विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 संजय शेलार व अध्यक्ष टिकुळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. सभेत पदोन्नती मिळालेले सभासद तसेच सेवानिवृत्त झालेले सभासद आणि सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा उपस्थित अधिकारी वर्गाच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या पतसंस्थेस सातत्याने लेखापरीक्षण वर्ग 'अ' प्राप्त झालेला आहे. संस्थेची सभासद संख्या 450 इतकी व भाग भांडवल 7 कोटी रुपयांइतके आहे. संस्थेकडे सुमारे 3 कोटीच्या सभासद ठेवी असून कर्ज वाटप 1 कोटी 50 लाख रुपये झाले आहे. सभेचे प्रास्तविक पतसंस्थेचे उपाध्यक्ष संजय ससाणे यांनी तर विषय पत्रिकेनुसार सभेचे कामकाज सेक्रेटरी शिवानंद जंगम व ईरण्णा सावळगी यांनी पूर्ण केले.
दरम्यान, वार्षिक सभेचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या संकल्पनेतून बिगर कृषी पतसंस्थांसंदर्भातील आर्थिक साक्षरता अभियानांतर्गत जिल्हा उपनिबंक मिलींद सोबले, विभागीय विशेष लेखापरिक्षक वर्ग-1 चे बाळासाहेब बडाख यांनी उपस्थित सभासदांना स्लाईड शोद्वारे आर्थिक साक्षरतेवर प्रशिक्षण दिले.