सातारा : संपूर्ण ऊसतोडीसाठी योग्य नियोजन आवश्यक; कारखान्यांकडूनही हालचाली सुरू | पुढारी

सातारा : संपूर्ण ऊसतोडीसाठी योग्य नियोजन आवश्यक; कारखान्यांकडूनही हालचाली सुरू

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सप्टेंबरअखेर आल्याने सर्व कारखान्यांमध्ये गळिताचे नियोजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदाही सातारा जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे यंदा हंगाम लवकर सुरू करण्याचा विचार आयुक्त कार्यालयाने केला होता. मात्र, पावसाने व सणामुळे त्यावर पाणी फिरण्याची चिन्हे आहेत. तसेच गतवर्षीप्रमाणे यंदा शिल्लक उसाचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी यावर्षी ऊसतोडीचे योग्य नियोजन करावे लागणार आहे.

ब्राझीलमध्ये आलेला दुष्काळ व देशांतर्गत उसाचे वाढलेले क्षेत्र याचा फटका सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांनाही बसला आहे. गतवर्षी पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक राहिल्याने शेतकर्‍यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. सातार्‍यातील वाई, सातारा, जावली, खंडाळा, कोरेगाव या तालुक्यांमध्ये उस शिल्लक राहिला होता. त्यामुळे शेतकर्‍यांनी अक्षरश: फड पेटवून दिले होते. ही नुकसान भरपाई शेेतकर्‍यांना देण्यात आलेली नाही.

जिल्ह्यात यंदा सुमारे 70 हजार हेक्टरवर उसाची लागण करण्यात आली आहे. या सर्व उसाचे गाळप व्हावे, यासाठी साखर आयुक्त कार्यालयाकडून प्रत्येक साखर कारखान्याकडून ऊसतोडीचा कार्यक्रम मागवून घेते. त्यानुसार हंगामाचे दिवस ठरवून कारखान्याला तोड करण्यास सांगते. एखाद्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस शिल्लक राहत असल्यास दुसर्‍या कारखान्याला हा ऊस
तोडण्याच्या सूचना साखर आयुक्त करतात. गतवर्षीही आयुक्तांनी याबाबतचे नियोजन घेतले होते. तरीही ऊस शिल्लक राहिला होता.
बहुतांश कारखान्यांनी आयुक्तांच्या आदेशाचे पालनच केले नाही. शिवाय काही कारखाने बंद राहिल्याने शिल्लक उसाचा प्रश्न निर्माण झाला होता.

यंदा मात्र अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. गतवर्षी बंद असलेले किसनवीर, खंडाळा आणि प्रतापगड हे कारखाने सुरू होणार आहेत. परंतु, ते किती क्षमतेने चालतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर्ण क्षमतेने चालले तर शिल्लक उसाचा प्रश्न राहणार नाही. पण हे कारखाने दोन वषार्ंपासून बंद असल्याने यंदाचा हंगाम कमी क्षमतेनेही होऊ शकतो. त्यामुळे ही बाब विचारात घेऊनच नियोजन करावे लागणार आहे.

10 हजार टन गाळप क्षमता वाढणार

किसनवीर, खंडाळा आणि प्रतापगड हे तिन्ही कारखाने यंदाच्या हंगामात सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याची दैनंदिन ऊस गाळप क्षमता 10 हजार टनाने वाढणार आहे. यासाठी तिन्ही
कारखान्यांनी टोळ्यांना अ‍ॅडव्हान्स दिला आहे. काही दिवसांत टोळ्या दाखल होतील. त्यामुळे सातारा, जावली, वाई, खंडाळा आणि कोरेगाव तालुक्यातील उसाचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जरंडेश्वर आणि अजिंक्यतारावरील ताण कमी होणार आहे.

Back to top button