Loksabha election | कोण ठरणार मावळचा शिलेदार?

Loksabha election | कोण ठरणार मावळचा शिलेदार?

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पक्षफुटीनंतर मावळ लोकसभेत शिवसेनेच्या दोन शिलेदारांत सरळ लढत झाली आहे. त्यांना महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षाची रसद मिळाली. या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवरून आगामी विधानसभा निवडणुकीचा उमेदवार ठरणार आहे. विधानसभेसाठी कोणाचे तिकीट पक्के होणार, याची गणिते मांडली जात असून, ते चित्र 4 जूनच्या निकालानंतर अधिक स्पष्ट होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे हे अजित पवार समर्थक आमदार आहेत. त्यांची भूमिका अनेकदा संभ्रमात टाकणार असते. त्यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार याचा पराभव केला होता. या मतदार संघावर भाजपने दावा केला असून, आरपीआर (आठवले गट) ही उत्सुक आहे. तर, शिवसेना ठाकरे पक्षाने मतदार संघ पुन्हा ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही दावेदारी केली आहे. यंदा 50.55 टक्के तर, मागील वेळेत 54.45 टक्के मतदान झाले होते. आमदार कै. लक्ष्मण जगताप यांची मजबूत पकड असलेला अशी चिंचवड विधानसभा मतदार संघाची ओळख आहे.

या भागांचा नियोजनबद्ध विकास झाल्याचे दिसून येते. जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप या आमदार झाल्या. राजकीय गणिते बदल्याने मतदार संघावरील भाजपची मजबूत पकड काहीसी सैल होताना दिसत आहे. भाजपमधून इच्छुकांची संख्या वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून या जागेवर दावा केला जाऊ शकतो. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रबळ दावेदार मानला जात आहे. येथे यंदा 4 टक्क्यांनी मतदान घटले आहे. 52.20 टक्के मतदान झाले असून, गेल्या निवडणुकीत ते 56.29 टक्के होते. मावळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार समर्थक सुनील शेळके हे आमदार आहेत. महायुतीत राष्ट्रवादी सामील झाल्याने भाजपाची ताकद वाढली आहे.

शेळकेंसह भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे इच्छुक आहेत. ते लोकसभेलाही इच्छुक होते. महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाकडून उमेदवार दिला जाऊ शकतो. गेल्या निवडणुकीत या मतदार संघात 62.29 मतदान झाले होते. यंदा ते घटून 55.42 टक्के इतके झाले आहे. घाटाखालील रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदार संघात भाजपचे दोन आमदार आणि शिवसेनेचा (शिंदे गट) एक आमदार असल्याने महायुतीचे पारडे जड आहे. पनवेलमध्ये भाजपाचे प्रशांत ठाकूर आमदार आहेत. त्यामुळे भाजपाची ताकद अधिक आहे.

झपाट्याने लोकवस्ती वाढत असल्याने पनवेल परिसरात अनेक नागरी प्रश्न आ वासून उभे आहेत. येथे मागील निवडणुकीत 55.32 टक्के मतदान झाले होते. यंदा ते घटून 50.05 टक्के मतदान झाले आहे. कर्जत मतदार संघात शिवसेनेचे (शिंदे गट) महेंद्र थोरवे हे आमदार आहेत. शिवसेनेची ताकद अधिक असल्याने महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंसाठी बाजू भक्कम दिसत आहे. मतदार संघात राष्ट्रवादीची संघटनही मजबूत आहे. मागील वेळेस 67.76 टक्के मतदान झाले होते. यंदा येथे घटून 61.40 टक्के झाले आहे.

उरण मतदार संघात भाजप संलग्न अपक्ष आमदार महेश बालदी हे आमदार आहेत. या भागात शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील आणि शिवसेनेचे वर्चस्व दिसून येते. यंदा येथे मावळ लोकसभा मतदार संघातील सर्वांधिक 67.07 टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीतही इतकेच मतदान झाले होेते. घाटाखालील या तीनही मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शेतकारी कामगार पक्षाचा पाठींबा असल्याने तसेच, महाविकास आघाडीतील घटक पक्ष सोबत आल्याने ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. तसेच, दहा वर्षांत अपेक्षित विकासकामे न झाल्याने विद्यमान खासदारांबाबत नाराजीचा सूर आहे. तसेच, शिवसेनेतील फूट कोणाच्या पथ्यावर पडणार हे ही निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

पनवेल, कर्जत, उरण विधानसभा रायगडला जोडण्याची हाक

पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा असे दोन विभागात मावळ लोकसभा मतदार संघ विभागला आहे. त्यांनी भागांची भौगोलिक रचना वेगवेगळी आहे. तसेच, राहणीमान व विचारसरणी भिन्न आहे. त्यामुळे दोन्हीकडील मतदारांचा कल एकसमान असतोच असा नाही. भौगोलिक रचनेमुळे घाटाखालील पनवेल, उरण व कर्जत या विधानसभा मतदार संघात गेल्या दहा वर्षांत विकास झाला नसल्याची मतदारांची प्रचंड नाराजी आहे. त्यामुळेच पनवेल, उरण आणि कर्जत हा विधानसभा मतदार संघ रायगड जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघाला जोडण्याची मागणी मतदारांतून रायगड जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news