नाशिक : हातची पिके वाया गेली; पशुधन वाचविण्याचे आव्हान | पुढारी

नाशिक : हातची पिके वाया गेली; पशुधन वाचविण्याचे आव्हान

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांत पुन्हा मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार सोमवारची (दि.19) सकाळदेखील रिमझिम पावसाने उजाडली. दुपारी पावणेतीनपासून मुसळधार पाऊस बरसला. एकीकडे लम्पी आजाराचे संकट घोंगावत आहे, तर दुसरीकडे मुसळधार पावसाने पिकांची नासधूस होत आहे. त्यामुळ पिके जवळपास वाया गेली असून, पशुधन वाचविण्याचे आव्हान शेतकर्‍यांसमोर ठाकले आहे.

तालुक्याच्या बहुतांश भागांत प्रामुख्याने पश्चिम पट्ट्यात सततच्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई मिळण्याची मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात टोमॅटो, भाजीपालावर्गीय पिके, वटाणा, वालवड, चायनीज पिकांना जादा फटका बसला आहे. पावसात खराब न होणारे सोयाबीन पीकसुद्धा सडले आहे. गावोगावीच्या शिवारात अद्यापही शेतांमध्ये पावसाचे पाणी साचलेले असून, जमिनी उफळून आल्या असून, पिके आता सडू लागली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकर्‍यांवर मोठे संकट कोसळले आहे. खतांचे, औषधांचे भाव वाढले आहेत. रस्ते वाहून गेले असून, जनावरांचा आजार वाढला आहे. पीक आणि पशुधन दोन्ही वाचविण्याचे आवाहन शेतकर्‍यांपुढे आहे.

लोकप्रतिनिधींकडूनही पावले उचलली जात नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. शेतकर्‍यांना वाचविण्यासाठी प्रशासनाने पंचनामे करून शेतकर्‍यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी. – कचरू गंधास, माजी चेअरमन, खरेदी-विक्री संघ.

पूर्व भागातील शेतकर्‍यांत पूरचारीने समाधान
देवनदी, म्हाळुंगीसह पश्चिम पट्ट्यात नद्यांच्या उगमस्थानी धुवांधार पाऊस सुरू असल्याने नद्यांना वारंवार पूर येत आहे. त्यामुळे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या दूरद़ृष्टीतून पूर्णत्वाकडे जात असलेल्या कुंदेवाडी-सायाळे बंदिस्त पूरचारीचे पाणी पांगरी या दुष्काळाने हैराण गावाच्या बंधार्‍यात पोहोचले आहे. पूरचारीच्या लाभक्षेत्रातील अनेक बंधारे भरले आहेत. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच शेती सिंचनाची चिंता मिटली आहे. परिणामी या गावांतील ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर समाधान आहे. पश्चिम पट्ट्यातील शेतकरी पावसाला पुरते वैतागले आहेत.

हेही वाचा:

Back to top button