नंदुरबार : तब्बल 24 वर्षांनंतर ‘या’ गावात धावली लालपरी; अतिदुर्गम हुंडा रोषमाळ गावात आनंद साजरा | पुढारी

नंदुरबार : तब्बल 24 वर्षांनंतर 'या' गावात धावली लालपरी; अतिदुर्गम हुंडा रोषमाळ गावात आनंद साजरा

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : २४ वर्षांनंतर धडगांव तालुक्यातील अतिदुर्गम नर्मदा नदीकाठावरील हुंडा रोषमाळ खुर्द येथे महाराष्र्ट्र राज्य मार्ग परिवाहन महामंडळाची बस गावात आली. यावेळी ग्रामस्थांनी आनंद, साजरा केला. विधिवत पूजा करून नारळ वाढवून आनंद व्यक्त करीत बसचे स्वागत केले. जिथे कधीही बस फिरकली नाही अशा अन्य गावांनाही यामुळे बस सेवा उपलब्ध झाली आहे.

जेष्ठ सेवानिवृत कर्मचारी बलसिंग पावरा यांच्या हस्ते हे पुजन व शुभारंभ करण्यात आला. हे गाव २४ वर्षापासूंन लालपरीच्या प्रतीक्षेत होते. हुंडा रोषमाळ ते धडगांव – मोलगी – अक्कलकुवा या मार्गाने हुंडा रोषमाळ खुर्द येथे ही मुक्कामी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे प्रवाशांची ये-जा करण्यासाठी सोय झाली आहे. या बससेवेमुळे नर्मदा काठावरील रोषमाळ खुर्द, ठुट्टल, चिचकाठी, बोरसिसा, गोराडी, पिप्री, आमलीपाणी, अट्टी, केली, थुवाणी, भरड, सिक्का, कुंबरी, अकवाणी, नळगव्हण, कुकतार, जलोला अशा १९ गावातील नागरिकांना बससेवेची सोय होणार आहे.

अक्कलकुवा ते हुडांरोषमाळ मधील एकूण अंतर ८५ किलोमीटर तर धडगांवपासून हुंडा रोषमाळ हे २४ किलोमीटर अंतर आहे. हुंडा रोषमाळहून धडगांव येथे बाजारासाठी जाणारे ग्रामस्थ, शिक्षणाकरिता जाणारी शाळकरी मुले यांना आता सोयीचे होणार आहे. हुंडा रोषमाळ खुर्द येथे बससेवा सुरु करण्यासाठी जि.प.सदस्या सौ.संगिताताई पावरा, माजी.जि.प. सदस्य, हारसिंग मल्या पावरा, धुळे विभागीय कार्यलय सहाय्यक वाहतुक अधिक्षक वडनेरे, अक्कलकुवा डेपोचे बाजीराव वसावे, अक्कलकुवा वाहतुक नियञंण अधिकारी दौलत पाडवी, चालक के. पी. पाटील, वाहक जयसिंग तडवी, तसेच नर्मदा परिसर विकास बहुउद्देशीय संस्था रोषमाळ खुर्द यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विजय पावरा पोलीस पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button