नाशिक : शहरात 13 मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश | पुढारी

नाशिक : शहरात 13 मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र दिन, रमजान ईद, अक्षय तृतीया यासह पारंपारीक उत्सवांच्या पार्श्वभुमीवर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत. 13 मे पर्यंत हे आदेश लागू राहणार असून त्याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

प्रतिबंधात्मक आदेशानुसार या कालावधीत नागरिकांना कोणतेही दाहक पदार्थ, स्फोटक पदार्थ, दगड किंवा शस्त्रे, सोटे, भाले, दंडे, काठ्या, बंदुका, शारीरीक इजा करण्यासाठी वापरात येणारी कोणतीही वस्तू बाळगणे गुन्हा ठरणार आहे. कोणत्याही व्यक्तींच्या चित्र, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढार्‍यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे गुन्हा ठरणार आहे. अर्वाच्य घोषणा देण्यास, मोठ्याने वाद्य वाजविण्यास देखील प्रतिबंध करण्यात आला आहे. आवेशपुर्ण भाषणे किंवा अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून फिरणे, फटाके वाजविणे, घंटानाद करणे, धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी करणे गुन्हा ठरणार आहे. पाच किंवा त्याहून अधिक लोकांचा जमाव करण्यास, पोलिस आयुक्तांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास, मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह अशा ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू राहणार नाहीत असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

Back to top button