सातारा शहराचा कमाल तापमानाचा पारा 38 अंशांवर | पुढारी

सातारा शहराचा कमाल तापमानाचा पारा 38 अंशांवर

सातारा : पुढारी वृत्तसेवा
मागील काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात तापमान वाढ सुरू आहे. सोमवारी सातारा शहराचा कमाल तापमानाचा पारा 38 अंशांवर गेला. तर थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणार्‍या महाबळेश्‍वरचे तापमान 31 अंशावर होते. मागील आठवड्यापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असल्याने उष्णतेने अंगाची लाहीलाही होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.

उन्हाळा सुरू झाल्यापासून तापमानाचा पारा चढू लागला आहे. मात्र मागील आठवड्यापासून हवामान खात्याने जिल्ह्यासह राज्यात उष्णतेच्या लाटेसह वळीव पावसाचा इशारा दिला आहे. त्याचा प्रत्यय मागील आठवड्यापासून जिल्ह्यात येत आहे. मागील आठवड्यात तापमानाने चाळिशीचा टप्पा ओलांडला असून गेल्या चार दिवसांपासून सातार्‍याचा पारा वाढताच राहिला आहे. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. दुपारी ऊन जास्तच वाढत जाईल तशी अंगाची लाही लाही होत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे दुपारचे बाजारपेठेतील व्यवहारही ठप्प होत आहेत. उन्हाचा वाढता पारा आणि वातावरणातील उकाडा यामुळे सातारकर मागील आठवड्यापासून चांगलेच घामाघूम झाले आहेत. जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून सोमवारी सातार्‍याचे तापमान 38 अंश तर थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्‍वरचे तापमानही 31 अंश नोंदवण्यात आले. ढगाळ वातावरणामुळे हवेत उकाडा निर्माण होत असून या उकाड्याने हैराण झालेले नागरिक हवेत गारवा निर्माण होण्यासाठी चांगल्या पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात आहेत.

Back to top button