नाशिक : फाळके स्मारक लवकरच होणार खुले | पुढारी

नाशिक : फाळके स्मारक लवकरच होणार खुले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येत्या काही दिवसांतच महापालिकेकडून पर्यटक तसेच नाशिककरांसाठी दादासाहेब फाळके स्मारक खुले करण्यात येणार असून, 29 एकरवरील फाळके स्मारकातील वॉटर पार्कसाठी निविदा काढण्याचे आदेशही मनपा आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. यामुळे लवकरच नागरिकांसाठी फाळके स्मारकाची दारे उघडी होणार आहेत.

दादासाहेब फाळके स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम खासगी ठेकेदाराला देऊ नये, अशा प्रकारचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनपा प्रशासनाला आढावा बैठकीदरम्यान दिले होते. त्यानुसार स्मारकाच्या निविदा प्रक्रियेला आयुक्तांनी स्थगिती देत फाळके स्मारक महापालिकेनेच चालविण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने 1999 मध्ये पाथर्डी फाटा परिसरातील 29 एकर जागेत फाळके स्मारक साकारले होते. मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नेमण्यात आलेल्या ठेकेदारांकडूनही स्मारकाची योग्य काळजी न घेतली गेल्याने या स्मारकाची सध्या दुरवस्था झाली आहे. या स्मारकापोटी मनपाला दरवर्षी लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत असून, ही दुरवस्था थांबवून स्मारकाला नव रूप मिळावे म्हणून मनपाने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून पुनर्विकासाचा निर्णय घेतला.

त्यानुसार काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत चित्रपट कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एन. डी. आर्ट वर्ल्ड या कंपनीला 30 वर्षे इतक्या दीर्घ कालावधीसाठी कराराने देण्यात येणार होते. त्याचवेळी फाळके स्मारक खासगी तत्त्वावर देण्याविषयी लेखापरीक्षकांनी आक्षेप घेत आर्थिकदृष्ट्या हे परवडणारे नसल्याचा अभिप्राय दिला होता. त्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही खासगी ठेकेदारामार्फत फाळके स्मारक चालवू नका, असे निर्देश दिल्यानंतर मनपा प्रशासनानेदेखील मनपामार्फतच स्मारक चालविण्याचा निर्धार करत त्याचा पहिला टप्पा म्हणून स्मारकातील वॉटर पार्कसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा :

Back to top button