NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण: ‘या’ कारणांसाठी मिळाली सुनावणीला मुदतवाढ | पुढारी

NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण: 'या' कारणांसाठी मिळाली सुनावणीला मुदतवाढ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ विधानसभा अध्यक्षांना देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (दि.२९) या प्रकरणावर सुनावणी झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ३ आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र न्यायालयाने १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल आता १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत द्यावा लागणार आहे. यापूर्वी विधानसभा अध्यक्षांना ३१ जानेवारी २०२४ ही अंतिम मुदत देण्यात आली होती.

विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वेळेनुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निकाल देण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. मात्र, शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी याला विरोध केला. केवळ एकच आठवड्याची मुदत द्यावी, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.

राहुल नार्वेकरांच्या वतीने तुषार मेहता यांनी यावेळी युक्तिवाद केला की, ३१ जानेवारीपर्यंत या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण होईल. मात्र निकाल लिहिण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ देण्यात यावा. दरम्यान, न्यायालयाने त्यांना १५ दिवसांचा वेळ दिला आहे. यावेळी ३१ जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होईल अशी हमी तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे राहुल नार्वेकरांना या प्रकरणाचा निकाल आता १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत द्यावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या आधी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणी पूर्ण करून निकाल देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना ३१ जानेवारी ही अंतिम मुदत दिली होती. दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात अध्यक्षांना निकाल देण्यासाठी १० दिवस वेळ वाढवून देण्यात आला होता.

निवडणूक आयोगाचा निर्णय कधी ?

निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर ताबा कोणाचा यासंदर्भात सुनावण्या झाल्या. दोन्ही बाजू पूर्णपणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आपला निकाल राखीव ठेवला आहे. ८ डिसेंबर २०२३ ला दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले होते. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल देताना शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आहे, असा निवडणूक आयोगाचा निर्णय स्पष्ट होता. राष्ट्रवादी काँग्रेसबाबद मात्र हा निकाल आलेला नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निकालापुर्वी निवडणूक आयोगाचा निकाल आल्यास ते शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाप्रमाणे निकाल देताना आयोगाच्या निकालाचा दाखला घेण्याची शक्यता आहे. मात्र निकाल न आल्यास अनेक महत्वाच्या बाबी विधानसभा अध्यक्षांनाच ठरवाव्या लागणार आहेत. आज सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाचा निर्णय कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा 

Back to top button