उडता महाराष्ट्र : मुंबई आणि सोलापुरात ११६ कोटींचे अंमली पदार्थ जप्त | Drug Seized in Solapur, Mumbai | पुढारी

उडता महाराष्ट्र : मुंबई आणि सोलापुरात ११६ कोटींचे अंमली पदार्थ जप्त | Drug Seized in Solapur, Mumbai

Drug Seized in Solapur : नाशिकनंतरची मोठी कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : नाशिकनंतर मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाचे आणखी एक रॅकेट उघडकीस आणले आहे. पोलिसांनी खार पश्चिम आणि सोलापूर येथे कारवाई करत एकूण १६ कोटींचे मेफेड्रॉन हे ड्रग्ज मेफेड्रॉन बनवण्यासाठी लागणार १०० कोटी रुपयांचा कच्चामाल जप्त केला आहे. अशा प्रकारे पोलिसांनी एकाच दिवसात तब्बल ११६ कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. गेल्याच आठवड्या पोलिसांनी नाशिकमध्ये ३०० कोटींचे ड्रग्ज पकडले होते. त्यानंतर आता सोलापुरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. खारमध्ये झालेल्या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली असून संशयितांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Drug Seized in Solapur, Mumbai)

गेल्या काही वर्षांतील सोलापुरातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. २०१६मध्ये ठाणे पोलिसांनी सोलापुरातील एक कारखान्यावर कारवाई करत तब्बल दोन हजार कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. २०१६च्या प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी घोषित अपराधी जाहीर झाले आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ससून ड्रग्ज प्रकरणातील फरारी ललित पाटील यालाही लवकर अटक होईल असे सांगितले.

असा लागला तपास

मुंबई पोलिसांनी खार पश्चिम येथे दोघांना काल रात्री अटक केली होती. यातील एक संशयित ३२ वर्षांचा तर दुसरा संशयित युवक २७ वर्षांचा आहे. या दोघांकडून ५.०८९ किलो इतके मेफेड्रोन जप्त करण्यात आले. याची किंमत १० कोटी १७ लाख ८० हजार इतकी आहे. या दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता सोलापुरात मेफेड्रोनचा कारखानाच सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सोलापुरातील या कारखान्यावर छापा टाकाला आणि ३ किलो मेफेड्रॉन जप्त केले. याशिवाय मेफेड्रॉन निर्मितीसाठी लागणारा तब्बल १०० कोटींचा कच्चा माल जप्त केला.

नाशिकनंतर मोठी कारवाई | Drug Seized in Solapur, Mumbai

मुंबई पोलिसांनी गेल्याच आठवड्यात नाशिकमध्ये एका कारखान्यावर कारवाई करून १५० किलो मेफेड्रॉन जप्त केले होते. जप्त केलेल्या मेफेड्रोनची किंमत ३०० कोटी इतकी आहे.

ससूनमधून ड्रग्जचे रॅकेट | Drug Seized in Solapur, Mumbai

ससूनमधून ड्रग्ज रॅकेट चालविणारा तस्कर ललित याने पलायन केले असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.  ललित आणि त्याचा भाऊ भूषण पाटील आंतरराष्ट्रीय बाजारात शेळ्या-मेंढ्यांची विक्री करतात असेही पोलिसांना दिसून आले आहे. दोघांची कंपनी दुबई व यूएईमध्ये शेळ्यांची निर्यांत करीत असल्याचे समोर आले आहे. या माध्यमातून पाटील बंधूंनी विदेशात ड्रग्ज तस्करी केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

ड्रग रॅकेट चालविणारा तस्कर ललित पाटील ससूनमधून पळून गेला आणि ड्रग्ज प्रकरण चर्चेत आले. ललीतच्या शोधात पोलिस जंगजंग पछाडत असताना मुंबईच्या साकीनाका पोलिसांना ललितचा भाऊ भूषण चालवत असलेल्या नाशिकमधील ड्रग्जच्या कारखान्याचा शोध लागला. यापूर्वीही 2020 मध्ये पोलिसांनी पाटील बंधूंचा चाकण येथील ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त केला होता. भूषण पाटील हा अ‍ॅग्रो अँड अ‍ॅनिमल कॉर्पोरेशन नावाची कंपनी नाशिक शहरातील म्हसोबा मंदिर उपनगर येथून चालवत होता, अशी माहितीही उजेडात आली आहे. ड्रग तस्करी करताना विविध क्लृप्त्या ड्रग तस्कर वापरत असतात. यामध्ये विदेशातून अमली पदार्थ तस्करी करण्यासाठी त्याची चोरट्या मार्गाने तस्करी केली जाते.

सोलापुरात कारवाई करण्यात आलेला कारखाना

दरम्यान ललित फरार झाल्यानंतर भूषण आणि अभिषेक हे दोघे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यापूर्वीच दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. दोघांना रात्री उशिरा पुण्यात आणण्याची प्रक्रिया पार पडली. भूषण आणि त्याचा साथीदार अभिषेक या दोघांचा शोध पोलिस घेत होते. तांत्रिक विश्लेषणाद्वारे केलेल्या तपासात भूषण आणि अभिषेक हे दोघे उत्तर प्रदेशात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. ललित हा 15 दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला पकडणे पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला असून, रात्रंदिवस पोलिसांकडून तपास केला जात आहे.

ड्रग्ज डिलर पोलिसांच्या रडारवर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या टार्गेट ड्रग्ज तस्करी रोखणे हे पोलिसांचे मूख्य टार्गेट असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “अलिकडेच मी क्राईम कंट्रोल कॉन्फरन्स घेतली होती. तेव्हाच सर्व युनिट्सला सांगितले होते की, आता आपले टारगेट ड्रग्स आहे. त्यावर सर्वांनी कडक कारवाई केली पाहिजे. सुरवातीला मुंबईने कार्यवाई केली. आता हळूहळू सर्व युनिट्स कारवाई करीत आहेत.”

ममता कुलकर्णी प्रकरण

२०१६मध्ये ठाणे पोलिसांनी तब्बल दोन हजार कोटींचे ड्रग्ज प्रकरण उघडकीस आणले होते. या प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा जोडीदार विकी गोस्वामी आरोपी आहेत. सोलापुरातील एका कारखान्यातून पोलिसांनी २० टन इफेड्रिन जप्त केले होते. दोघांनाही ड्रग्ज प्रकरणात घोषित अपराधी जाहीर केले आणि दोघांचीही मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा

Back to top button