Sassoon drug Case : ड्रग्ज तस्करीसाठी मोठी शहरे लक्ष्य; ललित, भूषणकडून ड्रगचा देशभरात पुरवठा | पुढारी

Sassoon drug Case : ड्रग्ज तस्करीसाठी मोठी शहरे लक्ष्य; ललित, भूषणकडून ड्रगचा देशभरात पुरवठा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आयटी, उच्च शिक्षित तरुणाईला लक्ष्य करत भूषण पाटील, ललित पाटील या ड्रग्ज तस्करांनी केवळ महाराष्ट्रातच आपले तस्करीचे जाळे विखुरले नसून, भारतातील मोठ्या शहरांनादेखील लक्ष्य केले होते. मुंबई, पुणे, ठाणे, बेंगलोर, गोरखपूर, दिल्ली, गुडगाव अशा शहरांबरोबरच देशातील अन्य मोठ्या शहरात त्यांची ड्रग्ज तस्करी सुरू असल्याचे तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. पाटीलच्या नाशिक येथील कारखान्यात दररोज 20 ते 50 किलो ड्रग्जची निर्मिती केली जात होती. त्याची कोट्यवधींमध्ये ड्रग्ज डिलिंग सुरू असल्याचेही आता समोर येत आहे.

भूषण पाटील हा मॅकॅनिकल इंजिनिअर होता. त्याने त्याच्या शिक्षणाचा उपयोग चांगल्या कामासाठी न करता त्याने ड्रग्ज निर्मितीचा अवैध उद्योग थाटला. नाशिकच्या त्याच्या कारखान्यात बनलेल्या मेफेड्रॉनच्या तस्करीची जबाबदारी ललित पाटीलकडे होती. तर, अभिषेक बलकवडेकडे मार्केटिंगची जबाबदारी असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.

ललित, भूषण आणि अभिषेक या त्रिकुटाचा आंतराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंध असण्याची शक्यता वर्तवत पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. ससून रुग्णालयातून होणारा ड्रग्ज तस्करीचा धंदा उघड करीत पुणे पोलिसांनी मोठे रॅकेट उद‌्ध्वस्त करीत तब्बल 2 कोटी 14 लाखांचे ड्रग्ज जप्त केले. याच गुन्ह्याचा तपास सुरू असताना ललित पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. ललितची शोधा शोध सुरू असताना मुंबई पोलिसांच्या पथकाने नाशिक परिसरातील शिंदे गावातून त्याचा भाऊ भूषण याच्या कारखान्यावर छापा टाकला. मुंबई पोलिसांनी 300 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. या कारवाईनंतर भूषण उत्तर प्रदेशात पसार झाला. गोरखपूर भागात नेपाळ सीमेजवळ भूषण असल्याची माहिती तांत्रिक तपासात मिळाल्यानंतर भूषण आणि बलकवडेला ताब्यात घेण्यात आले.

अकरा दिवसांनंतरही ललित फरारीच

ललित पाटील तब्बल अकरा दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती लागू शकला नाही. एकीकडे न्यायालयाने ललितच्या पलायन प्रकरणात खोचक भाष्य करत पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने त्याला पकडणे आता प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.

ललित महाराष्ट्रात की, देशा बाहेर?

ललित पाटील नेपाळला पळाला की तो महाराष्ट्रातून बाहेर न जाता अंडरग्राउंड आहे, अशा चर्चांनादेखील उधाण आले आहे. त्याबरोबरच त्याला पळून लावण्यात कोणत्या बड्या व्यक्तींचा सहभाग आहे का ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. ललित हा भूषण पळाला त्यामार्गे त्याला भेटण्यासाठी नेपाळ बॉर्डरकडे जाणार होता, मात्र भूषणला पकडल्याची चाहूल लागताच तो अंडरग्राउंड झाल्याचे बोलले जात आहे. ललितला पकडण्यासाठी पुणे पोलिसांची दहा पथके मागावर आहेत.

भूषण, ललित इतर तस्करांच्या संपर्कात

ललितचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक यांना उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली. ललित ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर अमली पदार्थाची विल्हेवाट लावण्यासाठी देशातील अनेक तस्करांच्या संपर्कात असल्याचा संशय पुणे पोलिसांनी भूषण आणि अभिषेक यांना न्यायालयात हजर केल्यानंतर व्यक्त केला होता.

मोठी साखळी उघड होण्याची शक्यता

भूषण आणि अभिषेक यांनी त्यांच्याजवळील मोबाईल फॉरमॅट केले आहेत. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने त्यांच्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. मोबाईलमधील माहिती मिळाल्यानंतर ललित, भूषण, तसेच अभिषेक ड्रग्ज तस्करीच्या धंद्यात नेमके कोणाच्या संपर्कात होते ? त्यामध्ये कोणत्या बड्या व्यक्तीचा हात होता ? याबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याबरोबर ड्रग्ज तस्करीची मोठी साखळी देखील उघड होऊ शकते.

महिन्याला 300 किलो ड्रग्जची निर्मिती

भूषणच्या नाशिक येथील अवैध कारखान्यात दररोज 20 ते 50 किलोपर्यंतची ड्रग्जची निर्मिती केली जात होती. या कारखान्यात महिन्याला सुमारे 300 किलो ड्रग्जची निर्मिती होत असल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. त्यांच्या महिन्याचा ड्रग्जचा व्यवहार शेकडो कोटींमध्ये असल्याचाही अंदाज आता व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा

Ayodhya : अयोध्येत २६ जानेवारीपासून भाविकांना दर्शन घेता येणार

आदिवासींवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार : प्रियांका गांधी-वधेरा

अमेरिकेत रुग्णांवर होतोय हॉस्पिटलप्रमाणेच घरच्या घरी इलाज

Back to top button