Shiv Sena MLA Disqualification : ‘त्या’ 16 आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक जाहीर; घ्या जाणून? | पुढारी

Shiv Sena MLA Disqualification : 'त्या' 16 आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक जाहीर; घ्या जाणून?

पुढारी ऑनलाइन डेस्क : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेण्याचं वेळापत्रक द्या, असं विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर अखेर कार्यवाही वेगाने सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या न्यायाधिकरणाने शेवटी अपात्रतेबाबतच्या सुनावणीच्या कामकाजाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १६ आमदारांची सुनावणी सोमवारी 25 सप्टेंबरला पार पडली.

दरम्यान, सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या अशी ठाकरे गटाकडून, तर या सर्वांना स्वतंत्र पुरावा द्यायचा असल्याने त्याची वेगवेगळी सुनावणी घ्यावी अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली होती. अपात्रतेची सुनावणी 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून सर्व याचिकांवरील सुनावण्या एकत्रित घ्यायच्या की नाही. याबाबत विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी वेळापत्रकच जाहीर केलं आहे. या मागण्यांवर 20 ऑक्टोबरला निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. (शिवसेना) ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी वेळापत्रकाची माहिती सोशल मीडियातून दिली आहे.

 

असं आहे वेळापत्रक घ्या जाणून?

6 ऑक्टोबर 2023 :

याचिकाकर्ते मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे 23 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रावर एकनाथ शिंदे गटाचे वकील त्यांचे उत्तर/म्हणणे दाखल करतील.

13 ऑक्टोबर 2023 :

अपात्रतेबाबतच्या सगळ्या पिटीशनची सुनावणी एकत्र व्हावी या ‘मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे’ मागणी करण्यात आलेल्या अर्जावर, 23 सप्टेंबर 2023 रोजी ‘मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे’ अतिरिक्त युक्तिवाद व कागदपत्रे रेकॉर्ड वर आणण्याऱ्या अर्जावर दोन्ही पक्षांनी आपले लेखी म्हणणे मांडावे व त्यावर युक्तिवाद होतील.

13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2023 :

अपात्रतात सुनावणी बाबत विधानसभा सचिवालयात दाखल असलेल्या कागदपत्रांची, आदेशांची पाहणी करण्यासाठी, कागदपत्रे शोधण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वकिलांना संधी देण्यात येईल. ( म्हणजे हा कालावधी केवळ ऑफिशियल कागदपत्रे पाहणी करण्यासाठी आहे)

20 ऑक्टोबर 2023 :

अपात्रतेबाबतच्या सगळ्या पिटीशनची सुनावणी एकत्र व्हावी, 23 सप्टेंबर 2023 रोजी ‘मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे’ अतिरिक्त युक्तिवाद व कागदपत्रे रेकॉर्डवर आणण्याची मागणी करणाऱ्या ‘मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे’ दाखल अर्जांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय आदेश जाहीर करतील.

27 ऑक्टोबर 2023 :

दाखल झालेल्या कागदपत्रांपैकी कोणते डॉक्युमेंट्स ऍडमिट करायचे व कोणते नाकारायचे यावर दोन्ही पक्षांनी आपापले म्हणणे सादर करावे. ( म्हणजे यादिवशी काही कामकाज होणार नाही तर केवळ लेखी म्हणणे सादर करण्याची कार्यालयीन प्रक्रिया होईल)

6 नोव्हेंबर 2023 :

अपात्रतेबाबत निर्णय घेतांना काय मुद्दे (issues) विचारात घेतले पाहिजेत यावर दोन्ही पक्षांनी आपले लेखी म्हणणे सादर करावे व एकमेकांना त्याच्या कॉपीज द्याव्यात.

10 नोव्हेंबर 2023 :

अपात्रतेबाबत निर्णय घेतांना काय मुद्दे (issues) विचारात घेऊन नक्की केले पाहिजेत यावर विधानसभा अध्यक्ष दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकतील.

20 नोव्हेंबर 2023 :

प्राथमिक तपासणी (examination in chief) घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी त्यांच्या साक्षीदारांची यादी व प्रतिज्ञापत्र दाखल करावेत. (म्हणजे यादिवशी सुद्धा काहीही न होता केवळ प्रक्रिया पूर्ण केली जाईल)

23 नोव्हेंबर 2023 :

या तारखेपासून उलट-तपासणी (cross examination) सुरू होईल आणि आवश्यकतेनुसार तसेच दोन्ही पक्षांच्या वकिलांच्याव सोयीनुसार तारखा देण्यात येतील. शक्य असेल त्याप्रमाणे उलट-तपासणी (cross examination) आठवड्यातून दोनदा घेण्यात येईल.

अंतिम युक्तिवाद

सगळ्यांचे म्हणणे-पुरावे ऐकून घेण्याची वरील सर्व प्रक्रिया संपल्यावर दोन आठवड्यानंतर अंतिम सुनावणीसाठी तारीख ठरवली जाईल.

( वरील वेळापत्रक कुणाचीही विशेष अडचण नसल्यास व कुणी सुनावणी तहकुबीचा अर्ज न दिल्यास शक्यतोवर ठरलेल्या तारखानुसार पार पाडला जाईल. व तारखांमध्ये काही बदल झाल्यास तसे वकिलांना कळवले जाईल असे विधानसभा सचिवालयाने विधानसभा अध्यक्षांच्या सहीने जाहीर कळवले आहे.)

हेही वाचा

मणिपूर पुन्‍हा अशांत, निदर्शनावेळी संघर्षात ५० विद्यार्थी जखमी

Pune news : जवळपास 48 तासांनी सापडला त्या तरुणाचा मृतदेह

नाशिक : सोशल मीडियावर दाखवली बंदूक, भाऊचा वाढदिवस पोलिस कोठडीत

Back to top button