मणिपूर पुन्‍हा अशांत, निदर्शनावेळी संघर्षात ५० विद्यार्थी जखमी | पुढारी

मणिपूर पुन्‍हा अशांत, निदर्शनावेळी संघर्षात ५० विद्यार्थी जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मणिपूरमध्‍ये दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्‍येच्‍या निषधार्थ राज्‍यातील विद्यार्थ्यांनी इम्‍फाळमध्‍ये तीव्र निदर्शने केली. यावेळी यावेळी विद्यार्थी आणि रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) जवानांमध्ये झालेल्या संघर्षात ५० हून अधिक विद्‍यार्थी जखमी झाले आहेत. पोलिसांनी जमावाला पांगविण्‍यासाठी अश्रुधुराचे कांड्या फोडल्‍या. दरम्‍यान, आदिवासींच्या हत्या आणि बलात्काराच्या सीबीआय चौकशीचे आदेश देण्यास होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ कुकी संघटनेच्या इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) च्या महिला शाखेने चुरचंदपूर येथे निदर्शने केली.

सोमवारी, दोन विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या झाल्‍याचे उघड झाल्‍यानंतर राज्यात पुन्‍हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे अफवांना पायबंद घालण्‍यासाठीराज्‍यात पुढील पाच दिवस इंटरनेट सेवा बंदी ठेवली आहे. तसेच शुक्रवार, २९ सप्‍टेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दोन विद्यार्थ्यांच्या हत्येचे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडे सोपवण्यात आले असून मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी सांगितले की, सीबीआयचे संचालक एका विशेष पथकासह बुधवारी या प्रकरणाच्या तपासासाठी इंफाळ येथे येतील.

सुरक्षा व्‍यवस्‍थेत वाढ

राज्‍यातील पुन्‍हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाल्‍यामुळे सुरक्षा व्‍यवस्‍थेत वाढ करण्‍यात आली आहे.राज्यात CRPF 121 कंपन्यांसह 214 कंपन्या तैनात आहेत. यामध्‍ये महिला CRPF च्या चार कंपन्या आणि RAF च्या 10 कंपन्या आहेत. बीएसएफच्या ७९ कंपन्या, आयटीबीपीच्या आठ कंपन्या आणि एसएसबीच्या सहा कंपन्या याशिवाय लष्कर आणि आसाम रायफल्सचा मोठा बंदोबस्त तैनात करण्‍यात आला आहे.

3 मे रोजी ईशान्येकडील राज्यात वांशिक संघर्ष सुरू झाल्यापासून 175 हून अधिक लोक मारले गेले आहेत, जेव्हा बहुसंख्य मैतेई समुदायाच्या अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा, या मागणीला विरोध करण्यासाठी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा :

 

 

Back to top button