मुंबई : भुलेश्वरमधील दोन व्यावसायिकांची एक कोटींची फसवणूक | पुढारी

मुंबई : भुलेश्वरमधील दोन व्यावसायिकांची एक कोटींची फसवणूक

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : भुलेश्वरमधील दोन व्यावसायिकांचा विश्वास घात करत दोघांनी सुमारे एक कोटींचे दागिने लंपास केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करुन वि. प. मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत. भाईंदरमधील क्राॅस गार्डन परिसरात रहात असलेले ४५ वर्षीय तक्रारदार हे सोने कारागीर आहेत. त्यांचा भुलेश्वर परिसरात सोन्याचे दागिने घडविण्याचा व्यवसाय आहे. सातरस्ता येथील रहिवासी असलेला यातील आरोपी हरिशंकर शर्मा याने त्यांच्याशी व्यावसायिक ओळख वाढवली.

त्यानंतर, तक्रारदार यांनी विश्वासाने त्याला ९३ लाख ६२ हजार ८०० रुपये किंमतीचे १६४२.५७० ग्रॅम सोन्याचे दागिने बनवून दिले. पण, शर्मा याने तक्रारदार यांना ना दागिन्याच्या बिलाचे पैसे पोच केले. ना दागिने परत केले. तो या दागिन्यांचा अपहार करुन कार्यालय बंद करुन पसार झाला. २१ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान ही घटना घडली. सर्वत्र शोध घेऊनही शर्मा न सापडल्याने अखेर तक्रारदार यांनी वि. प. मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.

भुलेश्वरमधील तिसरा भोईवाडा परिसरात रहात असलेल्या ४२ वर्षीय तक्रारदार यांचा सोने पाॅलिशिंगचा व्यवसाय आहे. मूळचा पश्चिम बंगाल येथील रहिवासी यातील आरोपी ख्वाजा बाबा शहा याला तक्रारदार यांनी २० ऑगस्टला पाच लाख ८० हजार रुपये किंमतीचे १२० ग्रॅम वजनाचे चार सोन्याचे हार लेझर सोल्डरिंगसाठी दिले होते. हे दागिने गहाळ झाल्याचे खोटे सांगून तो दागिने परत करण्यास टाळाटाळ करुन लागला. अखेर तक्रारदार यांनी वि. प. मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button