‘जग्गू दादा’ला दिलासा, हायकाेर्टाने प्रसिद्धी अधिकाराबाबत दिला ‘हा’ आदेश | पुढारी

'जग्गू दादा'ला दिलासा, हायकाेर्टाने प्रसिद्धी अधिकाराबाबत दिला 'हा' आदेश

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोणत्‍याही व्‍यक्‍ती किंवा संस्‍थेला अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा आवाज, नाव आणि छायाचित्रे व्यावसायिक कारणासाठी वापरता येणार नाहीत, असे दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे. विना परवानगी आपलं नाव, फोटो, आवाज आणि भिडू शब्द वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि 2 कोटी 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका जॅकी श्रॉफ यांनी दाखल केली होती.

उच्‍च न्‍यायालय काय म्‍हणाले?

उच्च न्यायालयाने जॅकी श्रॉफ यांचे नाव, त्यांची टोपणनावे ‘जॅकी’ आणि ‘जग्गू दादा’, आवाज आणि छायाचित्रे वापरण्यास बंदी घातली आहे. मंगळवारी, 14 मे रोजी या अभिनेत्याने यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्‍यांच्‍या याचिकेवर न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्‍या एकल खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्‍यायमूर्ती नरुला यांनी स्‍पष्‍ट केले की, कोणत्‍याही व्‍यक्‍ती किंवा संस्‍थेला अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा आवाज, नाव आणि छायाचित्रे ‘ई-कॉमर्स वेबसाइटवर वॉलपेपर, टी-शर्ट आणि पोस्टर इत्यादी विकणाऱ्या संस्था आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चॅटबॉट प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या संस्थांवर बंदी घातली जाईल. जॅकी श्रॉफ यांच्‍या वैशिष्ट्यांचा गैरवापर करून त्‍यांच्‍या व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्धीच्या अधिकाराचे उल्लंघन करण्‍यात येत ओह, असे निरीक्षणही न्‍यायलयोन नाेंदवले.

दोघांना बजावल्‍या नोटिसा

न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले की, जॅकी श्रॉफ यांच्‍या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांचे अनधिकृत पवार करुन विविध संस्थांनी व्यावसायिक फायदे मिळवले आहेत. त्यांनी परवानगीशिवाय अभिनेत्याचे नाव, प्रतिमा, आवाज आणि इतर विशिष्ट वैशिष्ट्ये वापरली आहेत. यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि प्रसिद्धी हक्क अधिकारांचे उल्लंघन होत आहे. न्यायालयाने जॅकी श्रॉफ यांच्या अधिकारांच्या उल्लंघनाबाबत इतर काही संस्थांना नोटिसा बजावल्या आहेत. यात एका YouTube सामग्री निर्मात्याने बदनामीकारक व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. दुसरा रेस्टॉरंट मालक त्याच्या आउटलेटसाठी नोंदणीकृत ट्रेडमार्क ‘भिडू’ वापरत असल्‍याची तक्रार नाेंदवण्‍यात आली हाेती.

काय होती जॅकी श्रॉफ यांची मागणी?

बॉलीवूडमध्‍ये जॅकी श्रॉफ यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्‍यांनी भिडू हा शब्‍द उच्‍चारणे चाहत्‍यांसाठी पर्वणी ठरते. त्‍यांच्‍या अभिनयाचीही ती ओळख आहे. परवानगीशिवाय आपल्या व्यक्तिमत्त्वाचा वापर होत असल्याबद्दल जॅकीने नाराजी व्यक्त केली आहे. याविरोधात त्‍यांनी आज ( १४ मे) दिल्ली उच्च न्यायालयात  याचिका दाखल केली होती.आपलं नाव, निवड आणि भिडू शब्दाच्या वापराबाबत अधिकार हवे आहेत, असे जॅकी श्रॉफ यांनी आपल्‍या याचिकेत नमूद केले आहे. विना परवानगी आपलं नाव, फोटो, आवाज आणि भिडू शब्द वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि 2 कोटी 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणीही त्‍यांनी याचिकेतून केली होती. उच्च न्यायालयाने सध्या सर्व आरोपींविरुद्ध समन्स जारी केले आहेत आणि एमईआयटीवाय (तंत्रज्ञान विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय) यांना अशा सर्व लिंक्स काढून टाकण्याचे निर्देश न्‍यायालयाने दिले होते.

काय म्‍हणाले जॅकी श्रॉफ यांचे वकील?

जॅकीचे वकील प्रवीण आनंद यांनी न्यायालयाला सांगितले होते की, जॅकी श्रॉफ यांची प्रतिमा डागाळली जात आहे. अश्लील मीम्समध्ये त्यांच्या नावाचा गैरवापर केला जात आहे. याशिवाय त्याच्या आवाजाचाही गैरवापर होत आहे. त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन थांबविण्यात यावे. अभिनेत्याची जॅकी श्रॉफ, जॅकी, जग्गू दादा आणि भिडू अशी वेगवेगळी नावे कोणत्याही व्यासपीठावर वापरण्यास बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे.

‘या’ कालाकारांनीही प्रसिद्धी हक्कांसाठी घेतली होती न्‍यायालयात धाव

प्रसिद्धी हक्कांसाठी न्यायालयाकडे मदत मागण्याची बॉलीवूडमधील अभिनेत्‍याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी लोक अभिनेत्याची कॉपी करणे आणि त्याच्या संमतीशिवाय त्याचा आवाज वापरण्यापासून रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मागील वर्षी अनिल कपूर यांनीही आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी ‘झाकस’ शब्द असलेल्या बोलण्‍याची लकब, त्याचे नाव, आवाज, बोलण्याची पद्धत, प्रतिमा, उपमा आणि देहबोली यांच्या संरक्षणाची मागणी केली होती. न्‍यायालयाने अमिताभ बच्‍चन आणि अनिल कपूर यांच्‍या याचिकांवर सुनावणी घेत दोघांनाही त्‍यांच्‍या प्रसिद्धी हक्कांसाठी कायद्‍याचे संरक्षण दिले होते.

हेही वाचा : 

Back to top button