राज्यभरात एकल महिलांचे सर्वेक्षण करणार : मंगलप्रभात लोढा | पुढारी

राज्यभरात एकल महिलांचे सर्वेक्षण करणार : मंगलप्रभात लोढा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  नगर जिल्हा परिषदेने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यामध्ये एकल महिलांची संख्या तब्बल १००७२६ आढळल्याने राज्याची यंत्रणा खडबडून जागी झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

एकल महिला समितीच्या विनंतीवरून अहमदनगर जिल्हा परिषद उएज आशिष येरेकर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता असे सर्व एकल महिला सर्वेक्षण केले. त्यात ८७ हजार विधवा , ६ हजार घटस्फोटित व ६ हजार परित्यक्ता आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत हे सर्वेक्षण केले. त्यात नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील महिला मिळवल्या तर नगर जिल्ह्यात ही संख्या दीड लाख होईल. एका जिल्ह्यात एक ते दीड लाख महिला असतील तर राज्याच्या ३६ जिल्ह्यांत नक्कीच ५० लाख एकल महिला असू शकतील. १३ कोटीच्या महाराष्ट्रात या ५० लाख महिला व त्यांची मुले अशी दीड कोटी संख्या आहे. या एकाकी महिला कसे आयुष्य कंठत असतील, या प्रश्नांनी अक्षरश: फेर धरला व एकल महिलांसाठी अविरत काम करणारे कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी हा प्रश्न बुधवारी महाराष्ट्रासमोर ठेवला. त्याचे उत्तर मिळण्यासाठी पुढारी प्रतिनिधीने राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी संपर्क साधला.

लोढा म्हणाले, विधवा महिलांना मदत करण्यासाठी सरकारची पेन्शन योजना आहे. त्याद्वारे त्यांना मासिक आर्थिक सहाय्य दिले जात आहे. एकट्या अहमदनगर जिल्ह्यातील विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता महिलांची ही संख्या विचारात घेतली तर ती निश्चितच चिंता करण्यासारखी आहे. संपूर्ण राज्यातील एकल महिलांची गणना करण्याचे निर्देश दिले जातील. त्यानंतर या घटकांसाठी आणखी काही कल्याणाच्या योजना आखल्या जातील. आमचे सरकार या महिलांच्या प्रश्नांकडे बारकाईने लक्ष देत आहे, असेही लोढा यांनी नमूद केले.

Back to top button