शिवसेना दसरा मेळावा : मुख्यमंत्र्यांचा भाजपवर वर्मी घाव; ठाकरेंच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे - पुढारी

शिवसेना दसरा मेळावा : मुख्यमंत्र्यांचा भाजपवर वर्मी घाव; ठाकरेंच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना दसरा मेळावा होणार आहे, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. या मेळाव्यातल मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकताही सर्वांना लागून राहिली होता. अखेर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर थेट निशाणा साधला आहे. पाहुयात त्यांच्या या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे…

१) आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. जन्मालादेखील आला नाही. जिवंत शिवसैनिक हीच माझी खरी शस्त्रे आहेत. खरंतर मी तुमच्यातलाच एक आहे. मी मोठेपणा दाखवणार नाही. मी पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणताहेत मी गेलोच नाही. नाही गेलो तर बसा तिथेच, उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर साधला निशाणा.

२) आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही. अंगावर कोण आलं तर तिथल्या तिथंच ठेचू. अंगात धमक असेल तर अंगावर या. ईडी, सीबीआयची मदत घेऊ नका. माझं भाषण संपतंय कधी आणि मी चिरकतोय कधी, याची वाट पाहताहेत. पण, हे चिरकणं काही जणांसाठी रोजगार हमीचं काम आहे. शिवसेनेला दिलेला शब्द पाळला असता तर मुख्यमंत्रीपदी राहिला असता, अशीही टीका त्यांना विरोधकांवर केली.

३) पूत्र कर्तृत्व म्हणून मी राजकारणात आलो. मी हे पद जबाबदारीनं स्वीकारलं आहे. देश हा माझा धर्म म्हणून आम्ही वाटचाल करतो. मी फकीर नाही. झोळी घेऊन जाईन असं मी म्हणणार नाही, असाही टोमणा पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी लगावला आहे.

४) मोहन भागवतांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांचे पूर्वज परग्रहावरून आलेत का? छापा टाकायचा आणि काटा काढयचा, हे जास्त काळ चालू शकत नाही. सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, तर हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. हर हर महादेव काय असतं ते दिल्लीच्या तख्ताला दाखवावं लागेल, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

५) नवहिंदुत्वापासून हिंदुत्वाला धोका आहे. माय मरो आणि गाय जगो, असं आमचं हिंदुत्व नाही. १९९२ साली शिवसेनेने मुंबई वाचवली होती. देव, धर्म देशासाठी शिवसैनिकाचा जन्म झाला आहे. हर्षवर्धन पाटील तुमच्यात आले आणि पवित्र झाले. गटाराचं पाणी भाजपात टाकलं तर गंगा होते, असा टोमणाही त्यांनी लगावला.

शिवसेना दसरा मेळावा

६) कोणाच्याही कुटुंबावर आरोप करणारे नामर्द आहेत. सत्तापिपासूपणा किती असावा? राज्यातल्या पोटनिवडणुकांमध्ये यांच्याकडे उमेदवार नाहीत. जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला उपरे उमेदवार आणावे लागतात. संस्कार आहेत म्हणून गप्प आहोत. नाहीतर फाडून टाकायला वेळ लागणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

७) मध्यंतरी राज्यपालांनी पत्र लिहिलं. त्यांनी महिलांच्या अत्याचारावरून दोन दिवसीय अधिवेशन घेण्यास सांगितले. मोदींना सांगा दोन दिवसांचं किंवा आठवडाभराचं अधिवेशन घ्या. महाराष्ट्राकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. महाराष्ट्रात जर लोकशाहीचा खून, उत्तर प्रदेशात लोकशाहीचा मळा फुलला आहे का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

८) ७५ वर्षांत आपण काय केलं, यावर ऊहापोह होणं गरजेचं आहे. आता महिलांच्या अत्याचारावर, देशाच्या संघराज्यावर चर्चा झाली पाहिजे. केंद्राएवढीच राज्येदेखील सार्वभौम राहतील. केंद्राइतकेच राज्याला अधिकार आहे. या सर्व मुद्द्यांवर उघड चर्चा व्हायला पाहिजे. देशातील अभ्यासकांनी माझ्या मुद्द्यावर मतं व्यक्त केली पाहिजेत.

९) सत्तेची चटक लागली की, दुसऱ्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करायला लागतात. केंद्र सरकारची ढवळाढवळ सहन केली जाणार नाही. मुंद्रा  बंदरावर सापडलेल्या करोडो रुपयांच्या अंमली पदार्थ सापडले त्यावर का बोलत नाहीत? त्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कॅगने सांगितलं आहे की, मोदी सरकार आल्यानंतर गुजरातला सर्वाधिक निधी देण्यात आला आहे.

१०) मुलगी शिकली, प्रगती झाली. पण, नोकरी कुठे आहे. कोरोना काळात केंद्राने इतर राज्यांना निधी दिली, पण महाराष्ट्राला दिला नाही. एकतर्फी प्रेमासारखं महाराष्ट्रावर एसिड का फेकताय? चीनमधल्या कंपन्यांना महाराष्ट्रात आणत आहोत म्हणून हे महाराष्ट्राला बदनाम करत आहे, काय मिळणार आहे तुम्हाला बदनाम करून? अशी जोरदार टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना दसरा मेळावा मध्ये केली.

Back to top button