भगवान गड : "अपनी हद रोशन करने से, तुम मुझे कब तक रोकोगे" - पुढारी

भगवान गड : "अपनी हद रोशन करने से, तुम मुझे कब तक रोकोगे"

बीड, पुढारी वृत्तसेवा : “तुम मुझे कब तक रोकोगे, मुठ्ठी मे कुछ सपने लेकर, दिल मे अरमान यही, कुछ कर जाये, सुरज सा तेज नही मुझमे, दिपक सा जलता देखोगे, अपनी हद रोशन करने से, तुम मुझे कब तब राकोगे’ आपण लवकरच राज्यभरातील ऊसतोड कामगारांशी संवाद साधण्यासाठी थेट ऊसाच्या फडात जाणार आहे”, अशा शब्दात भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भगवान गड येथे सांगितले.

दसर्‍यानिमित्त पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे भगवानबाबांच्या जन्मभूमीत (भगवान गड) आयोजित मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. या मेळाव्यास खा. प्रितम मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, खा.सुजय विखे पाटील, आ.बोaर्डीकर, आ.नमिता मुंदडा, कर्डीले, आ.सुरेश धस, प्रविण घुगे, रमेश आडसकर, भीमराव धोंडे, फुलचंद कराड, महंत राधाताई महाराज सानप यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थिती होती.

कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी मी काही करत नाही.

प्रारंभी खा. प्रितम मुंडे, महादेव जानकर यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली. विराट जनसमुदायासमोर बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, “इतका देखणा सोहळा देशात कुठे होत नसेल. मी आज हेलीकॉप्टरने इथपर्यंत आले, तेथून बैलगाडीत बसून मंचापर्यंत आले. हेलीकॉप्टरमधून मी भगवानबाबांच्या मूर्तीवर फुले टाकली, ती त्यांच्यावरील श्रद्धेपोटी. कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी मी काही करत नाही. माझ्या पित्याच्या पश्‍चात माझे कोणी नाही, तुम्हीच माझे पाठीराखे आहात, वेळ आली तर तुमच्यासाठी जीव ओवाळून टाकीन” असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे

“लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी एकच धडा शिकवला, जिथे जन्म घेतला त्या मातीचा, त्या माऊलीचा अन् जातीचा कधी अपमान वाटला नाही पाहिजे. त्या मातीसाठी, माणसांसाठी आपण कार्यरत राहिले पाहिजे. त्यांनी सुरु केलेली ही दसरा मेळाव्याची परंपरा लोकांना ऊर्जा देण्यासाठी आहे. या ठिकाणची ही छोटीशी ज्योत मशाल बनून राज्याच्या कानाकोपर्‍यात जाणार आहे. आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा बघितला. त्या ठिकाणी आदरणीय मोहनजी भागवत हे मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी भेदभाव संपवण्याचे आवाहन केले. हा मंचही असाच सर्वसमावेशक आहे. या ठिकाणी सर्व जाती, धर्माचे, विचारांचे लोक आलेले आहेत. हा कोणत्या पक्षाचा कार्यक्रम नाही. या सर्वांची वज्रमूठ करुन सर्वसामान्यांसाठी मला काम करायचे आहे.”

“काही लोक म्हणत होते, सत्ता नाही मेळावा नको, लोक अडचणीत आहेत, मेळावा नको. अरे हा मेळावा सत्तेसाठी नाही तर माझ्या लोकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी, त्यांना ऊर्जा देण्यासाठी आहे असे मी सांगितले. या ठिकाणी राज्याच्या कानाकोपर्‍यातून लोक येतात अन् वर्षभरासाठी ऊर्जा घेऊन जातात”, असेही पकंजा मुंडे यांनी सांगितले.

मराठा, ओबीसी आरक्षणासाठी दौरा

सरकार कोणाचेही असो सामान्य माणूस उपाशीच आहे. सरकारने मदत जाहीर केली ती तोकडी आहे. शेतकर्‍यांना भरीव मदत करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू करा या मागण्यांसाठी मी रस्त्यावर उतरणार आहे. आमची सत्ता असतांना शेतकर्‍यांना मदत अन् भरघोस विमा मिळत होता. परंतु आता फक्त मंत्र्यांचा फायदा होत आहे. आपल्याकडच्या मंत्र्यांनी तर मंत्रीपद किरायाने दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रार्थनालय, महाविद्यालय, रुग्णालय स्वच्छ ठेवा

मेळाव्यामधून पंकजा मुंडे यांनी आपआपल्या गावातील प्रार्थनालय, महाविद्यालय आणि रुग्णालय स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना केले. तसेच तंबाखुचे व्यसन सोडण्याचेही आवाहन केले.

ऊसतोड कामगार महामंडळ माझ्या मनासारखे झाले नाही

भाजपच्या सत्ताकाळात ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा झाली. परंतु त्या माध्यमातून ठोस काम करता आले नाही. याला कारणही तसेच आहे. मला जसे हवे होते तसे महामंडळ त्यावेळी झाले नाही. याच्या कारणाचा तुम्हीच विचार करा. पण आता लोक नोंदणीसाठी तुमच्यापर्यंत येताहेत, त्याची पायाभरणी आम्हीच केली होती.

जनतेसाठी काम हवे

विरोधी पक्षातील लोक सरकार पाडण्याचे रोज नवे मुहूर्त सांगतात. तर सत्ताधारी पक्षाचे लोक सरकार मजबूत असल्याचे सांगतात. आता यातून दोघांनीही बाहेर यायला हवे. सरकार पाडण्याचे अन् मजबूत करण्यापेक्षा जनतेसाठी काम करा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

पहा व्हिडीओ : ओबीसी राजकारणाचा गुरुमंत्र देणारा भगवानगड

Back to top button