बेस्टच्या ‘ई बाईक’ सेवेचा लहान मुलांकडून गैरवापर  | पुढारी

बेस्टच्या 'ई बाईक' सेवेचा लहान मुलांकडून गैरवापर 

धारावी : पुढारी वृत्तसेवा : बसमधून उतरणाऱ्या प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी बेस्टकडून मुंबईत ई – बाईक सेवा सुरु करण्यात आली. मात्र, या सेवेचा सर्रास गैरवापर सुरु असल्याचे धक्कादायक चित्र धारावीसह मुंबईतील बहुतांश झोपड्पट्टीबहुल विभागात दिसत आहे. त्यातच ई – बाईक चालविण्यासाठी कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसल्याने झोपडपट्ट्यात राहणारी १० ते १२ वयोगातील चिमुरडी ई – बाईक मुख्य रस्त्यावर बेधडक चालवत असल्याने धोका वाढला आहे.

या चिमुरड्या ई – बाईकस्वारामुळे होणाऱ्या अपघाताच्या भीतीने वाहनचालक तसेच पादचारी धास्तावले असून संबंधित प्रशासनाने या ई – बाईक चालविणाऱ्यांसाठी वयोमर्यादा निश्चित करावी, अशी मागणी होत आहेत. बेस्ट प्रशासनाने बस प्रवाशांसाठी ई – बाईक सेवा मोठ्या थाटामाटात सुरु केली. त्यासाठी मुंबईतील बहुतांश मुख्य बस थांब्यावर हजारहून अधिक ई – बाईक तैनात करण्यात आल्या आहेत. बेस्ट चलो अॅप वरून ई – बाईक सेवा सहज उपलब्ध होत असल्याने बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सेवेचे कौतुक केले. परंतु झोपडपट्टीत भाड्याची सायकल चालविणारी चिमुरडी या ई – बाईक भाडयाने घेऊन चालवीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ई – बाईकसाठी लागणारे मूळ भाडे २० रुपये, प्रति किलोमीटर प्रवासासाठी ३ रुपये आणि १ रुपये ५० पैसे प्रतिमिनिट असल्याने शिवाय ती मोबाईल अॅपवरून सहज उपलब्ध होत असल्याने एखाद्या खेळण्यासारखा ई – बाईकचा वापर चिमुरडी करत आहेत.

धारावीत राहणारी चिमुरडी दादर, माहीम येथील जवळच्या बस थांब्यावरून चलो अॅपच्या माध्यमातून ई – बाईक भाड्याने घेऊन त्यावर डबलसीट बसून मुख्य रस्त्यावर भरधाव फेऱ्या मारत आहेत. रस्त्यावरील सिग्नल अथवा वाहतूक नियमांबाबत चिमुरडी अनभिज्ञ असल्याने अपघाताची शक्यता वाढल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, या गैरवापरामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण ? यासाठी किमान १८ वर्षे वयोमर्यादा संबंधित प्रशासनाने निश्चित करून ई – बाईकस्वाराना विम्याचे संरक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा 

Back to top button