Mumbai Metro | मुंबई मेट्रोच्या प्रवाशांना मोठा दिलासा, ‘ही’ सेवा सुरु | पुढारी

Mumbai Metro | मुंबई मेट्रोच्या प्रवाशांना मोठा दिलासा, 'ही' सेवा सुरु

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या समन्वयाने बेस्ट मार्फत गुंदवली मेट्रो स्थानक ते बीकेसी अशी प्रीमियम एसी बस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे मुंबई मेट्रोच्या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे. बेस्टची बस क्र. एस – ११२ ही बस प्रवाशांना गुंदवली मेट्रो स्थानक ते बीकेसी आणि बीकेसी ते गुंदवली या मार्गावर चालवली जात आहे. (Mumbai Metro)

दरम्यान एकूण २१ थांबे आहेत. गुंदवली ते बीकेसी या मार्गावर सकाळी ०७:३० वाजल्यापासून ११:४० वाजेपर्यंत १६ फेऱ्या, तर बीकेसी ते गुंदवली या मार्गावर दुपारी ३:४० वाजल्यापासून पासून रात्री ८:१५ वाजेपर्यंत १३ अशा एकूण २९ फेऱ्या चालवत आहे. गुंदवली ते बीकेसी या प्रवासादरम्यान प्रवाशांच्या गंतव्य स्थानकापर्यंत सुमारे रू.६० ते रू.९० इतके भाडे आकारले जात आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना ‘चलो’ या बेस्ट बस ॲपचा वापर करून तिकीट बुक करावे लागेल.

Mumbai Metro : मुंबईकरांना सुखकर प्रवास करता यावा

“गुंदवली मेट्रो स्थानक ते बीकेसी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुविधेसाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. मेट्रो स्थानकांजवळील पार्किंगची जागा उपलब्ध करुण देणं असो की इलेक्ट्रिक बाइक्स उपलब्ध करून देणं, मुंबईकरांना मेट्रोनं प्रवास करताना त्यांच्या प्रवासातील अडथळे कसे पार होतील यावर आम्ही भर देत आहोत. मुंबईकरांना सुखकर प्रवास करता यावा, यासाठी आम्ही इतर संस्थांसोबत समन्वय निर्माण करण्याची आणि एक मजबूत कार्यप्रणाली तयार करण्याची योजना आखत आहोत.” असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आणि महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. आर. श्रीनिवास, भा. प्र. से. यांनी म्हटले आहे.

हेही वापरा 

Back to top button