ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक; शिवडी पोलिसांची राजस्थानात कारवाई   | पुढारी

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक; शिवडी पोलिसांची राजस्थानात कारवाई  

धारावी : पुढारी वृत्तसेवा : एका ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना तीन वेगवेगळ्या ठिकाणांवरून अटक करण्यात शिवडी पोलिसांना यश आले आहे. अब्दुल चुटमल खान (वय ४१), मोहम्मद झहीर सत्तर खान (वय ३५), सागर भैरू लाल सैनी (वय २७)  अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर फसवणुकीच्या कलमांसह आयटी अॅक्टनुसार गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. सपोनि स्नेहलसिंग खुळे अधिक तपास करत आहेत.

विरार पूर्व येथे राहणारे फिर्यादी केतन किरण येदे यांनी २६ जुलै २०२२ रोजी ऑनलाइन पी.के वाईन्स शॉपच्या साईट वरती ऑनलाइन दारू खरेदीसाठी ९३३७८७३७५८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला होता. यावेळी भामट्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डमधून २ लाख ३९ हजार ७२३ रुपये काढून घेतले. ते पाहून धास्तावलेल्या फिर्यादीने तात्काळ भामट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन बंद असल्याचे पाहून तो हादरला. तात्काळ त्याने शिवडी पोलीस ठाणे गाठून अज्ञात भामट्यांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआरचे अवलोकन करून मोबाईलचा आयएमईआय प्राप्त करून तपास सुरु केला. दरम्यान, पोलिसांनी बँक, पेटीएम, गुगल पे यांच्याकडून आरोपीबाबत माहिती मिळविली असता सदर आरोपी कुलियाना, मेवाड, डिग्गी, राजस्थान येथे असल्याचे पोलिसांना समजले. तत्काळ सपोनि स्नेहलसिंग खुळे यांनी वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राहुल शिंदे आपल्या पथकासह कुलियाना, मेवाड, डिग्गी, राजस्थान येथे जाऊन संबंधित एका आरोपीचे मोबाईल लोकेशन प्राप्त करून जहीर सत्तारच्या मुसक्या आवळल्या. तर दुसरा आरोपी अब्दुल चुटमल याला पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर तिसरा आरोपी सागर सैनीला सापळा लावून अलवर येथून अटक केली. आरोपींकडून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

हेही वाचा 

Back to top button