खा. संजय राऊत-स्वप्ना पाटकर मिस्ट्रीची चर्चा! | पुढारी

खा. संजय राऊत-स्वप्ना पाटकर मिस्ट्रीची चर्चा!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना खा. संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर राऊत यांच्यावर गंभीर आरोप करणार्‍या स्वप्ना पाटकर आता चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. मनोविकार तज्ज्ञ, स्तंभलेखक, चित्रपट निर्माती असलेल्या पाटकर याच संजय राऊत यांच्या अटकेचे कारण ठरल्या आहेत. राऊत यांची बेनामी संपत्ती आपल्या नावावर असल्याचा जबाब पाटकर यांनी ईडीला दिला आणि संजय राऊत यांच्याभोवती अटकेचा फास आवळला गेला.

शिवसेना नेते खा. संजय राऊत यांना रविवारी ईडीने अटक केली. पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केल्यानंतर प्रवीण राऊत यांच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नीला दिलेल्या 55 लाखांच्या बिनव्याजी रकमेची चर्चा सुरू झाली. मात्र, या अटकेमागे स्वप्ना पाटकर यांचे कनेक्शन उघड झाले आहे. यानंतर राऊत आणि पाटकर मिस्ट्रीची जोरदार चर्चा सुरू झाली. एका वृत्तवाहिनीने संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्यातील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप जारी केली. मात्र, उभयतांमध्ये हे संभाषण झाले की नाही, हे संशयास्पद असून, पोलिसांनी या क्लिपची सत्यता पडताळण्यासाठी कथित ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबकडे पाठविली आहे.

पाटकर या मनोविकार तज्ज्ञ आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकात त्यांचे स्तंभलेखन सुरू होते. यादरम्यानच त्यांची संजय राऊत यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर पुढे त्यांनी शिवसेना नेत्यांचे समुपदेशन वर्गही घेतले. हळूहळू मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्यांचे सेमिनारही सुरू झाले. काही काळानंतर पाटकर यांचे पती सुजित पाटकर यांचीही राऊत यांच्याशी ओळख झाली आणि हे दोघे राऊत कुटुंबीयांचे निकटवर्तीय बनले. राऊत यांच्या भांडुपच्या घरापासून ते दादरच्या फ्लॅटपर्यंत स्वप्ना पाटकर यांचा वावर सुरू झाला. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन घेतली तेव्हा या व्यवहारात स्वप्ना पाटकर यांच्या नावावरही काही जमीन घेण्यात आली. राऊत यांच्या प्रत्येक महत्त्वाच्या व्यवहारांत पाटकर यांचा थेट सहभाग होता. त्यानंतर पाटकर यांनी मुंबईत फॅमिली रेस्टॉरंट आणि चित्रपटनिर्मिती कंपनी सुरू केली. याच कंपनीने ‘बाळकडू’ चित्रपटाची निर्मिती केली. असे सारे काही सुरळीत सुरू होते. मात्र, कालांतराने दोघांमधील व्यावहारिक संबंध बिघडले. यानंतर राऊत कुटुंबीयांनी पाटकर यांच्याबरोबरच सर्व आर्थिक संबंध तोडून टाकले. दरम्यानच्या काळात पाटकर दाम्पत्यानेही घटस्फोटाचा निर्णय घेतला.

ऑडिओ क्लिपमध्ये 27 वेळा शिव्या

पाटकर यांची मनोविकार तज्ज्ञ असल्याची पदवी खोटी निघाली आणि त्यांना आघाडी सरकारने याप्रकरणी अटकही केली. एकदा संजय राऊत यांनी त्यांना केबिनमध्ये बोलावून त्यांचा हात पकडला होता, असे स्वप्ना यांनी जबाबात म्हटले आहे. शिवाय, राऊत यांनी फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला. मात्र, गेल्या तीन वर्षांत पाटकर यांची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नाही. त्यानंतर मविआची सत्ता गेली आणि एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. 70 सेकंदांच्या क्लिपमध्ये राऊत हे कथितरीत्या पाटकर यांना 27 वेळा शिव्या देत असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दाखवले खरे; मात्र या संभाषणाच्या सत्यतेबाबत वृत्तवाहिनेने हात झटकले आहेत.
वाकोला पोलिसांत राऊतांवर गुन्हा स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीची दखल राज्य सरकारच्या गृह खात्याने घेतली आणि वाकोला पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. राऊत यांना झालेली अटक ही पाटकर यांनी दाखल केलेल्या केसमधील नसली, तरीही त्यांच्याच एका कबुली जबाबामुळे राऊत यांना ईडी कोठडीत जावे लागले असल्याचे सांगितले जात आहे.

स्वप्ना पाटकर यांचा जबाब

2007 साली आपली आणि संजय राऊत यांची भेट झाली. यानंतर कौटुंबिक संबंध वाढत गेले. संजय राऊत यांना आपण त्यांच्या बिझनेस पार्टनर व्हावे, असे वाटत होते. मी याला नकार दिला. त्यामुळे राऊत यांना राग आला. 20 नोव्हेंबर 2016 रोजी मी राऊत यांना भेटायला ‘सामना’च्या कार्यालयात गेले, तेव्हा त्यांनी माझा हात पकडला आणि ते माझ्यावर ओरडले. याला विरोध करताना मी राऊत यांची कॉलर पकडली आणि निघून गेले, त्यावेळी राऊत यांनी पोलिस कारवाईची धमकी दिली होती.

Back to top button