रिक्षापुढे मर्सिडीजचा वेग फिका : एकनाथ शिंदे | पुढारी

रिक्षापुढे मर्सिडीजचा वेग फिका : एकनाथ शिंदे

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट होती. त्या रिक्षेला ब्रेकच लागत नव्हता, या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेत, रिक्षाच्या वेगापुढे मर्सिडिजचा वेग फिका पडला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून सणसणीत प्रत्युत्तर दिले.

रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट होती : उद्धव ठाकरे

कारण, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, विधानसभेत शिंदे यांनी सोमवारी आपल्यावरील सगळ्या टीकेला जोरदार उत्तर दिले होते. शिंदे म्हणाले, आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, आपल्याला कुठलीही राजकीय पार्श्‍वभूमी नाही.

आमच्या भूमिकेवर टीका करताना आम्हाला भाजीवाला म्हणाले, टपरीवाला म्हणून हिणवले, गाडीवाला म्हणाले; मात्र आम्ही आहोतच ना टपरीवाले. प्रामाणिकपणे व्यवसाय करणे चुकीचे आहे का? भाजी विकणे चुकीचे आहे का? हे सरकार सर्वसामान्य नागरिकांचे आहे, भाजीवाल्याचे आहे, टपरीवाल्याचे आहे, रिक्षावाल्याचे आहे. हे सरकार आपले आहे, असे प्रत्येकाला वाटेल अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव यांना उत्तर दिले.

फडवणीस यांचे जोरदार प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उद्धव ठाकरे यांच्या रिक्षावाला टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चायवाला म्हणून हिणवले होते. मात्र, ज्यांनी चायवाला म्हणून हिणवले त्यांच्यावर आज मोदी यांनी पाणी पिण्याची वेळ आणली आहे. आज त्यांच्या पक्षाची कशी अवस्था आहे हे तुम्ही पाहत आहातच. आम्ही रिक्षावाले असून, आम्हाला त्याचा अभिमानच आहे.

हेही वाचा

Back to top button