रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट होती : उद्धव ठाकरे | पुढारी

रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट होती : उद्धव ठाकरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट होती. त्या रिक्षेला ब्रेकच लागत नव्हता, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. ज्यांच्यावर पक्षाची धुरा सोपवली होती, त्यांनीच पाठीत वार केला, अशी टीकाही त्यांनी केला.

रिक्षापुढे मर्सिडीजचा वेग फिका : एकनाथ शिंदे

ज्यांच्यावर विश्‍वास ठेवू नका, असे सांगत होते ते अजून सोबत आहेत; पण ज्यांच्यावर विश्‍वास ठेवला त्यांनीच दगा दिला, अशी व्यथाही ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात व्यक्‍त केली. शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला खुर्चीतून खाली खेचला. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्या अश्रूंची किंमत त्यांना मोजावी लागणार, असा संताप उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्‍त केला.

एका बाजूला गद्दारांच्या डोळ्यांतले विकृत हसू आणि दुसर्‍या बाजूला निष्ठावंत शिवसैनिकांच्या डोळ्यांतले अश्रू, यामधून मला मार्ग काढायचा आहे, असे सांगत या परिस्थितून मार्ग तर नक्‍की काढणार. पंचवीस-तीस वर्षे सोबत राहिलो ते आपले एकदम कट्टर शत्रू झाले, अशी खंतही त्यांनी व्यक्‍त केली. विधान परिषदेमध्ये दोन्ही जागा जिंकून येतील, असे म्हणत होते, आलेदेखील निवडून; पण 12 मते त्यांनी आधीच बाजूला काढून ठेवली होती. मग त्यांचे कपटकारस्थान कधीपासून सुरू होते हे विधानसभेत गुपित उघड झाले, असे ठाकरे म्हणाले.

शिवसेना संपविण्याचा डाव

भाजपचा शिवसेना संपवण्याचा डाव आहे. शिवसैनिकांना शिवसैनिकांशी लढवायचे आहे. त्यासाठी हा दाढीवाला चेहरा पुढे केला आहे, आगामी निवडणुकांत तुम्हाला या गद्दारांच्या विरोधात रागाचा निखारा फुलवायचा आहे. निवडणुकांमध्ये यांना भुईसपाट करायचे आहे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

हेही वाचा

Back to top button