Hingoli News : कळमनुरीत वैद्यकीय अधिकार्‍यांविना रुग्णांची गैरसोय | पुढारी

Hingoli News : कळमनुरीत वैद्यकीय अधिकार्‍यांविना रुग्णांची गैरसोय

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा :  नांदेड, छत्रपती संभाजी नगर, नागपूरमध्ये रूग्ण दगावण्याची घटना ताजी असतानाच कळमनुरी तालुक्यातील रामेश्‍वर तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मागील महिन्याभरापासून वैद्यकीय अधिकार्‍यांविनाच सुरू आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणार्‍या रूग्णांची प्रचंड कुचंबना होत आहे. गंभीर रूग्णास कळमनुरी येथील उपजिल्हा रूग्णालयात किंवा हिंगोली येथे पाठविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

रामेश्वर तांडा आरोग्य केंद्रात २ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती होती. पण एका वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सेवा निवृत्तीनंतर मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याचीही बदली झाली, असे सांगितले जाते. या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. या केंद्रांतर्गत दिग्रस बु, कुर्तडी, बोथी, कांडली, रामेश्वर तांडा अशा पाच पैकी चार उपकेंद्रावर डॉक्टर आहेत. पण उपकेंद्रातर्गतचे रुग्ण रामेश्वर तांडा येथील आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणीसाठी येत असतात. पण मागील एक महिन्यापासून या ठिकाणी कोणताही वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. नांदेड येथील घडलेल्या प्रकारामुळे या परिसरातील आरोग्य केंद्रामध्ये सध्या जेमतेम औषधी साठा उपलब्ध झाला आहे. परंतु गरोदर महिलांना देण्यात येणाऱ्या कॅल्शियम गोळ्या मात्र मागील सहा महिन्यापासून उपलब्ध नसल्याची माहिती संबंधित औषधी निर्माता कर्मचारी नादरे यांनी दिली.

२ ऑक्टोबरपासून वारंगा फाटा येथील उपकेंद्राचे आयुर्वेदीक डॉ. मोरे यांची तात्पुरती नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली. पण मुख्य वैद्यकीय अधिकारी मात्र एक महिन्यापासून आरोग्य केंद्रावर हजर नाहीत. याबाबत काही कर्मचारी म्हणतात की, त्यांची बदली कुरुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर झाली आहे तर त्यांनी एक महिन्याची त्यांनी रजा घेतली आहे. असे काही कर्मचारी सांगत आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन रामेश्वर तांडा कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button