मंचर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या गाळप हंगामात गळीत झालेल्या उसाचे शेतकर्यांना प्रतिटन अधिकचे चारशे रुपये मिळावे ही आमची मागणी असून, मागणी पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू आहे. मागणी मान्य न झाल्यास साखर कोंडी करून या वर्षीचा हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते मंचर (ता. आंबेगाव) येथे बुधवारी (दि. 4) पत्रकारांशी बोलत होते.
संबंधित बातम्या :
उसाची 'एफआरपी' निश्चित करताना कृषिमूल्य आयोग शेतकर्यांचा उत्पादन खर्च जसा गृहीत धरते तसा कारखान्याला मिळणारे उत्पन्नही विचारत घेतले जाते. केंद्र सरकारने या वर्षीची साखरेची किंमत किमान 3100 रुपये क्विंटल निश्चित केलेली आहे, याचा अर्थ कृषिमूल्य आयोगाने 3100 रुपये साखर कारखान्याला निश्चित मिळणार हे गृहीत धरले आहे. गेल्या वर्षी मात्र साखर कारखान्याची साखर 3300 रुपये क्विंटलने विकली गेली. दर वाढायला लागले. आता ती 3800 रुपयांपर्यंत पोहचली आहे. सरासरीपेक्षा कारखान्यांना त्यामुळे क्विंटलमागे 500 रुपये उत्पन्न अधिक मिळालेले आहे. या 500 रुपये अधिकच्या उत्पन्नातील शेतकर्यांना 400 रुपये मिळावेत, ही आमची रास्त आणि अर्थशास्त्रीय भूमिका आहे. किमान विक्री किमतीपेक्षा पाचशे रुपये क्विंटलमागे कारखान्यांना जास्त मिळाल्याने अधिकचे चारशे रुपये घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, प्रसंगी सरकारच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
इथेनॉलमुळे कारखान्याच्या उत्पादनात वाढ
कारखान्यांनी साखरेचे उत्पादन कमी करून उसातील साखर इथेनॉल तयार करण्यासाठी वापरली आहे. त्यामुळे कारखान्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.