धुळे : पुढारी वृत्तसेवा, धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभाराविरोधात संतप्त होत ताई गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करीत निदर्शने करण्यात आली. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नादुरुस्त मशिनरी तातडीने दुरुस्त करावी, तसेच पुरेसा औषध साठा उपलब्ध करून ठेवण्यात यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच राज्यातील आरोग्य यंत्रणा ढिसाळ झाल्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
संबधित बातम्या :
हिरे वैद्यकीय महाविद्यालय हे धुळे शहरा बाहेर प्रशस्त जागेत स्थलांतर झाल्यानंतर सुपर स्पेशलिटी सारखा आणि पदव्युत्तराचे विद्यार्थी आल्यानंतर अधिक सुविधा रुग्णांना मिळतील, अशी लोकांना अपेक्षा होती. परंतु हे केवळ रेफर सेंटर ठरले आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांसह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील काही भागातील रुग्णू उपचारासाठी येतात. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात सिटीस्कॅन सारख्या सुविधा सुद्धा उपलब्ध नाहीत. डायलिसिस मशीन बंद पडले आहे. तसेच मुबलक प्रमाणात औषध साठा उपलब्ध नाही. विविध प्रकारच्या मशिनरी खराब होऊन पडलेल्या आहेत. वयोवृद्ध, गर्भवती यांच्या सह सर्वांना दोन ते तीन मजली रोज चढ उतार करतांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या सह पिण्याच्या पाण्याचीही गंभीर अवस्था असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने केला. या संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनासमोर कार्यकर्त्यांनी आपली व्यथा मांडली.
वैद्यकीय महाविद्यालयात मुबलक औषधी साठा व सर्व मशनरी दुरुस्त करून रुग्णांसाठी उपयोगात याव्या व स्वच्छता करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच या आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप नागरिकांचा जीव गेला त्याला जबाबदार राज्याचे आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनातून राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने करण्यात आली आहे.
या वेळी पक्षाचे रणजीत भोसले, उषा पाटील, राजू डोमाळे, भिका नेरकर, डी टी पाटील, डॉमिनिक मलबारी, हाजी हासिम कुरेशी, असलम खाटीक, मनोज कोळेकर, मंगलदास वाघ, राजेश तिवारी, जयदीप बागल, समद शेख, चेतन पाटील, आकाश बैसाणे, मंगलदास वाघ, विश्वजीत देसले, गोलू नागमल, वैभव पाटील, विशाल भामरे, नजीर शेख, अभिजित देवरे, राजू मशाल, विशाल बोरसे, मसूद शेख आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा :